देवेंद्रला मारहाण करताना गजा मारणे हजर:सीसीटीव्ही फुटेज समोर; ‘याला माज आलाय, याला मारा’ सूचनाही करत असल्याची माहिती

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गजा माराने टोळीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यावरून देवेंद्र जोक याला मारहाण झाली त्यावेळी गजा मारणे हा काही अंतरावरच उभा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे. याचबरोबर ‘याला माज आलाय, याला मारा’ अशा सूचना देखील गजा मारणे तिथे उपस्थित आपल्या माणसांना देत होता. या संदर्भातले पुरावे आता न्यायालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी गजा मारणेला तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर या ठिकाणी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे टोळीतील गुन्हेगारांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या देवेंद्र जोक यांना मारहाण केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गजा मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर आणि श्रीकांत पवार या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रुपेश मारणे आणि श्रीकांत पवार अद्यापही फरार आहेत. नेमके प्रकरण काय? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मिडीयाचे काम पाहणाऱ्या व्यक्तीला कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीकडून मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारे आरोपी नुकतेच एका प्रकरणात जामिनावर सुटेल आहेत. कारागृहातून बाहेर येताच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण केल्याने आता सामान्य व्यक्तीच्या सुरक्षेचे काय असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. तर गृहमंत्र्यांसह पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नाही असा टोला ही काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी लगावला होता. मुरलीधर मोहोळ यांनी निवासस्थानी भेट दिली भारतीय जनता पक्षाचा पुणे येथील कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या वेळी मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. देवेंद्र सारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापि सहन होणार नसल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.