‘डीजीसीए’चा परवाना मिळाला; आठवड्यात 3 दिवस उड्डाण:अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून लवकरच सुरू होणार प्रवासी विमानसेवा

बेलोरा विमानतळाला डीजीसीएकडून प्रवासी विमानोड्डाणाचा परवाना मिळाला असून, अलायन्स एअरलाइन्स आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई अशा विमान फेऱ्या करणार आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत हा परवाना मिळाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमाद्वारे दिली आहे. बेलोरा विमानतळाला मिळालेला प्रवासी विमानोड्डाणाचा परवाना मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या प्रमुख पूजा चावला यांच्याकडे सोपवला. त्यावेळी प्रवासी विमानोड्डाणाचा परवाना मिळणे हा मैलाचा दगड असून, यामुळे अमरावतीसाठी एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. जिल्ह्याचा आर्थिक विकास, पर्यटनाला चालना आणि एकूणच विकासाची ही सुरुवात म्हणता येईल, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा अलायन्स एअरलाइन्स आठवड्यातून तीन दिवस देणार आहे. ७२ आसनी विमानाला आकाशात झेपावता येईल, इतपत बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीवर सोय आहे. ही धावपट्टी १८७२ मी. लांबीची असून, येथे सध्या दिवसा विमानोड्डाणाची सोय आहे. काही दिवसांनी रात्रीही विमानोड्डाण शक्य होणार आहे. अद्याप रात्रीला विमानोड्डाण करणारी यंत्रणा इन्स्टॉल व्हायची आहे. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाची धावपट्टी, टर्मिनल इमारत, एटीसी इमारत पूर्णपणे तयार असून विमान व्यवस्थित लॅण्डींग व टेकऑफ घेते की नाही. सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतात की नाही, यासंदर्भातील कॅलिबर चाचणी एक आठवडा आधी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. दोन महिन्यापूर्वी बेलोरा विमानतळाद्वारे डीजीसीएकडे प्रवासी विमानोड्डाणाचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर डीजीसीएचे पथक विमान तळावर येऊन गेले. त्यांनी सकारात्मक अहवाल सादर केल्यामुळे दोन महिन्यांतच बेलोरा विमानतळाला परवाना मिळाला. यामुळे नागरिकांचा नागपुरातून मुंबईकडे विमानाने जाण्यास होणारा खर्च, वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी विमानाने अमरावतीहून आता कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. मार्चच्या शेवटी होणार पहिले विमानोड्डाण मार्च महिन्याच्या शेवटी मुंबई-अमरावती-मुंबई विमान पहिले उड्डाण करणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ३१ मार्च रोजी अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून पहिले प्रवासी विमान मुंबईच्या दिशेने झेपावेल अशी घोषणा केली होती. याचाच पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त करताना केला आहे.