धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले:सनसनाटी आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न; 59 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप

अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे केवळ त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले आहेत. कृषी विभागात मी मंत्री असतानाच्या काळात झालेली सर्व खरेदी ही शासन नियमानुसारच झाली असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. सनसनाटी, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची, याव्यतिरिक्त याच्यात मला काहीही आढळत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गेल्या 59 दिवसापासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. ते का चालू आहे? कोण चालवतेय? हे मला माहिती नाही, असे देखील मुंडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचा अंजली बदनामिया असा उल्लेख करत टोला हाणला. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहेत. आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही, असा होत नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना ऐवजी दमानियांना माहित आहे का? असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया यांचा खोटेपणा हा केवळ मला बदनाम करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी आजपर्यंत केलेले कोणतेच आरोप खरे निघाले नसल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया जेव्हापासून आरोप करतात तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झाला आहे का? असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या आधी ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्या नेत्यांकडे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे आरोपी मारले गेले आहेत, असा दावा देखील दमानिया यांनी केला होता. हा देखील दमानियांचा खोटेपणा होता, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. आरोप करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना शुभेच्छा. मात्र, माझे राजकीय आयुष्य मायबाप जनतेवर अवलंबून असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केला आहे. मी मंत्री असताना कृषी विभागात जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण पूर्व मान्यतेनेच राबवली गेली असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले गेले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभाग व्हावे म्हणून दोन वेळा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. भ्रष्टाचार करायचा असता तर दोन वेळा मुदत वाढ देईल का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. एखाद्याच राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. या प्रकरणी आरोपींना फासावर लटकवणे आमची जबाबदारी आहे. यातून वाद विवाद नको म्हणून मी गप्प आहे. एक विषय झाला की दुसरा विषय काढला जातोय? काय करायचं? अंजली दमानिया माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम करत आहेत. त्यांना हे काम ज्यांनी कोणी दिले असेल त्यांना माझ्या शुभेच्छा. मात्र साप साप म्हणून जमीन थोटपणे, मीडियातून सनसनाटी निर्माण करणे आणि एखाद्याच राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते, असे आव्हान देखील मुंडे यांनी दिले आहे.

Share