धनंजय मुंडे यांच्या विधिमंडळात भेटीगाठी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दहा मिनिटे चर्चा; राजीनाम्याबाबत संभ्रम कायम

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजीनामाची मागणी होत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे आणि फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानले जात आहे. धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड सोबत असलेल्या संबंधामुळेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला होता. इतकेच नाही तर अधिवेशनाच्या दरम्यान त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, असा दावा देखील त्यांनी केला होता. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे हे विधिमंडळ परिसरात विविध नेत्यांच्या भेटी घेत असल्याने त्यांच्या राजीनामा बाबत पुन्हा एकदा संभ्रम वाढला आहे. करुणा मुंडे यांचा दावा काय? याबाबत माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या होत्या की, मला शंभर टक्के माहिती मिळाली आहे की, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे. उद्या शंभर टक्के राजीनामा होणार आहे. वाल्मीक कराड दोशी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची घोषणा करतील, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. नीतिमत्तेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे – रामदास आठवले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे. अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोमवारपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनाम न घेतल्या पेटून उठू, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला. तर करुणा मुंडे यांनी तर 3 मार्च रोजी धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल, असा दावाच केला. यावर केंद्रीय मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली. मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. अजितदादांनी याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचेही आठवले म्हणाले. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.