दिशा सालियन प्रकरणी याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत:आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते व मंत्री नीतेश राणे हे सातत्याने आरोप करत आले आहेत. आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची देखील मागणी नीतेश राणे यांनी केली आहे. असे असले तरी दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी मात्र आदित्य ठाकरेंचा यात संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी दाखल असलेल्या याचिकेवर देखील न्यायालयाने आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज का? हे पटवून द्या, असा सवाल याचिकाकर्त्यांना विचारला आहे. तसेच आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांची देखील या प्रकरणात याचिका दाखल आहे. आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, असा अर्ज आदित्य ठाकरेंच्यावतीने देण्यात आला आहे. दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच 8 जून 2020 रोजीचे दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सुरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईलचे लोकेशन तपासले जावे, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते, असा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केला आहे. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावे, अशी देखील मागणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा कॉल
याचिकाकर्त्यांनी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला त्या दरम्यान 44 वेळा फोनवर बोलणे झाले असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांच्यात काय बोलणे झाले आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच मंत्री नीतेश राणी यांनी आदित्य ठाकरेंवर लहान मुलांच्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता, याची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या बाजूने देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. या सुनावणीत आपली देखील बाजू ऐकून घ्यावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. आता या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यात आदित्य ठाकरे यांच्या चौकशीबाबत पटवून देण्याची मागणी केली आहे.

Share

-