दिव्य मराठी अपडेट्स:देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर सजले; निवासस्थान परिसरात ‘देव दिवाळी’ साजरी करण्याचा रहिवाशांचा निर्णय

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर सजले; निवासस्थान परिसरात ‘देव दिवाळी’ साजरी करण्याचा रहिवाशांचा निर्णय नागपूर – तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूर येथे येत आहेत. त्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातील नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांचे स्वागत करताना ‘देव दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय त्यांचे निवासस्थान परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत दंगल, अमानुष मारहाण; आज बंदची हाक परभणी – परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच मनोरुग्णाने फोडली. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष या व्यक्तीला अमानुष मारहाण केली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. सोपान दत्तराव पवार (45) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या संतप्त जमावाने जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन परिसरात रास्ता रोकोे केला. सायंकाळी 7 च्या सुमारास शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. काही हुल्लडबाजांनी गांधी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर, आयटीआय परिसरातील दुकानांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभ्या वाहनांचेही नुकसान केले. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण केले. जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनमध्येही जमाव घुसला होता. त्यांनी स्थानकावर आलेली नंदीग्राम एक्स्प्रेस रोखून संताप व्यक्त केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुढे गेली. तरुणीशी बळजबरीने संबंधामुळे आ. टिळेकरांच्या मामाचा खून पुणे – भाजपचे विधान परिषद आमदार याेगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (58) यांचे साेमवारी पहाटे हडपसर परिसरातील शेवाळेवाडी येथील घराबाहेरून चार जणांनी कारमधून अपहरण केले हाेते. सायंकाळी यवत परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मंगळवारी नवनाथ गुरल, पवन शर्मा या दोन आरोपींना अटक केली. वाघ यांनी एका तरुणीशी बळजबरीने अनैतिक संबंध ठेवले होते. त्या रागातून हा खून झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यांच्या शरीरावर शस्त्राचे 70 घाव असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. नवनाथ गुरल याच्या नात्यातील एका 30 वर्षीय तरुणीसोबत वाघ यांनी बळजबरीने शारीरिक संबंध केले होते. ही बाब मुलीने नातेवाइकांना सांगितल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात सतीश वाघ यांचे अपहरण करून निर्घृण खून केला असल्याची कबुली दिली आहे. आजपासून मोशी येथे कृषी प्रदर्शन ‘किसान’ सुरू पुणे – भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान पुणे येथे मोशी, भोसरीजवळ, आयोजित केले जात आहे. 15 एकर पसरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या 5 दिवसांमध्ये देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील, असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी केली. पुण्यात 14 डिसेंबरपासून पुस्तक महोत्सव पुणे – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावर 14 डिसेंबरपासून भव्य पुस्तक महोत्सव सुरु होत आहे. त्याचे उद‌्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी 13 डिसेंबर रोजी सरस्वती यंत्रचा विश्वविक्रम याच मैदानावर करण्यात येणार आहे. उद‌्घाटनापूर्वी पुस्तक दिंडी काढण्यात येणार असून त्यात सुमारे 100 महाविद्यालयाची विद्यार्थी सहभागी होतील. टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन महाविद्यालय यादरम्यान ही रॅली असणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे यांनी दिली. ‘शांतता पुणेकर वाचत आहे’ हा उपक्रम 11 डिसेंबर साजरा होणार आहे. यात रिक्षा स्थानक, बस स्थानक, मनपा, महाविद्यालय, शाळा, कारागृह, सरकारी कार्यालय, विविध ऑफिस याठिकाणी हा उपक्रम दुपारी 12 ते 1 दरम्यान होणार आहे. फसवून दुबईत नेलेल्या महिलेची केली सुटका ठाणे – ‘स्टेज शो’मध्ये काम देतो असे सांगून मुंब्रा शहरातील एका महिलेला डान्सबारच्या कामामध्ये ढकलण्यात आले. तिने काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्याकडून सुटकेसाठी पैशांची मागणी होऊ लागली. अखेर मुंब्रा पोलिसांच्या मदतीने तिची सुखरूप सुटका झाली. मुंब्रा येथे 27 वर्षीय पीडित महिला तिच्या पतीसोबत वास्तव्यास आहे. तिला नृत्याची आवड आहे. त्यामुळे ठाणे परिसरात विविध ‘स्टेज शो’मध्ये ती भाग घेत असते. हे हेरून तिला दुबईत कामाचे आमिष दाखवण्यात आले होते. भांडण पाहण्यासाठी गेलेल्या एकावर कोयता, चाकूने वार परभणी – शहरातील खानापूर फाट्याजवळील हॉटेलवर झालेले भांडण पाहण्यासाठी गेलेल्या एकावर कोयता, चाकूने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी 8 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास खानापूर फाटा भागातील कृष्णा हॉटेलजवळ घडली. ज्ञानोबा मोहिते यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे हॉटेलवर नातेवाइकांसोबत बसले होते. या वेळी त्यांच्या चुलत भावाच्या हॉटेलवर वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे फिर्यादी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी संशयितांनी ज्ञानोबा मोहिते यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. जखमी मोहिते यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचितच्या उमेदवाराचा सहानुभूतीसाठी हल्ल्याचा बनाव हिंगोली – कळमनुरी विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या वाहनावर हल्ला झाला होता. हा प्रकार बनाव असून डॉ. मस्के यांना निवडणुकीत सहानुभूती मिळावी यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. मस्केसह तिघांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. कळमनुरी मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. मस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास, डॉ. मस्के हे हिंगोलीकडे जात असताना, सेलसुरा पाटीजवळ पांढऱ्या रंगाच्या कारमधील पाच व्यक्तींनी त्यांची कार फोडली. यामध्ये डॉ. मस्के यांनाही दुखापत झाली. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी तपास केला. परिस्थितीजन्य पुरावे व अधिक माहिती घेतली असता, डॉ. मस्के यांना सहानुभूती मिळविण्यासाठी डॉ. सुरज राठोड याने त्याच्या वसमत येथील मित्रांना बोलावले. तसेच डॉ. मस्के यांच्या वाहनावर हल्ला करण्यास सांगितले. मात्र त्यांनी हल्ला करण्यास नकार दिला. त्यामुळे डॉ. राठोड, डॉ. मस्के व चालक आफताब पठाण यानेच गाडी फोडून हल्ल्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून कळमनुरी पोलिसांकडे सोपवले आहे. 2 कोटींच्या खंडणीसाठी परळीत व्यापाऱ्याचे अपहरण‎ परळी‎ – शहरातील व्यापारी अमोल डुबे यांचे पाच‎जणांनी अपहरण करत दोन कोटी रुपयांची ‎‎खंडणी मागितली. अपहरणकर्त्यांची गाडी‎बंद पडल्याने डुबे यांनी दहा तोळ्यांचे‎सोन्याचे बिस्कीट, एक तोळ्याचे लॉकेट‎असा 8 लाखांचा मुद्देमाल अपहरणकर्त्यांना‎देऊन रात्री 12 वाजता सुटका करुन घेतली.‎‎भाजपचे ज्येष्ठ नेते‎‎विकास डुबे यांचे पुत्र‎‎अमोल डुबे यांच्याकडे‎‎ऑइल कंपनीची‎‎जिल्ह्याची एजन्सी आहे.‎‎9 डिसेंबर रोजी रात्री‎‎आठ वाजता सर्व हिशेब‎करून आपल्या दुचाकीने (एमएच 44 जे‎4322) ते घराकडे निघाले होते. त्यांच्या‎दुकानापासून 50 मीटर अंतरावर एक कार‎त्यांच्यासमोर आडवी करत पाच जणांनी‎त्यांना पकडून गाडीत बसवले. कन्हेरवाडी‎घाटातील गोशाळेजवळ ही कार बंद पडली.‎या वेळी अपहरणकर्त्यांनी त्यांना गाडीतून‎खाली उतरवत 2 कोटी रुपयांची खंडणी‎मागितली. डुबे यांनी ड्रायव्हरमार्फत ऐवज‎मागवून आरोपींना दिला. याप्रकरणी 5 ‎अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला.‎ तरुणाच्या त्रासाला कंटाळून अंबडला मुलीची आत्महत्या जालना – फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून, 16 वर्षीय अकरावीच्या विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी अंबडच्या शारदानगर परिसरात घडली. भाग्यश्री सुरेश घाडगे (16) असे मृत मुलीचे नाव आहे. वडील सुरेश घाडगेंच्या फिर्यादीवरून सोहम मिंधर, त्याचे वडील बळीराम मिंधर, दुर्गेश एकनाथ चित्रे (अंबड) यांच्यासह अन्य एक महिलेविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला. सीयूईटी-यूजी : बारावीच्या विषयांची सक्ती नाही नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सीयूईटी-यूजीच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, 2025 पासून ही परीक्षा केवळ संगणक आधारित स्वरूपात (सीबीटी) घेतली जाईल. 12वीमध्ये ज्यांचा अभ्यास केला नाही असे विषय निवडण्याची मुभादेखील उमेदवारांना दिली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात कोणताही विषय निवडण्याची संधी मिळेल. विषयांची संख्याही 63 वरून 37 पर्यंत कमी करण्यात आली आहे.

Share

-