दुर्मिळ बॉम्बे रक्तगटाच्या 4 युनिट्स मिळाल्या:चंद्रपूरच्या महिलेची गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया यशस्वी

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील एका भाजीपाला विक्रेत्या महिलेची गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. महिलेला दुर्मिळ बॉम्बे रक्तगटाच्या 4 युनिट्सची गरज होती. डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी या रक्तगटाच्या शोधासाठी विशेष प्रयत्न केले. महिलेला गर्भाशयात गाठी असल्याने मासिक पाळीत अतिरक्तस्त्राव होत होता. त्यामुळे तिचे हिमोग्लोबिन 4 पर्यंत खाली आले होते. गडचिरोली येथे प्राथमिक उपचारादरम्यान तिचा बॉम्बे रक्तगट असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला नागपूर जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. रक्तपेढीने मुंबई ते सातारा संपर्क साधून विक्रम यादव यांच्याकडून एक युनिट रक्त मिळवले. उर्वरित रक्त डॉ. हेडगेवार रक्तपेढीतील रक्तदात्यांकडून मिळाले. रक्तपेढीतील ओ पॉझिटिव्ह रक्तदात्यांच्या रक्ताची अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली असता ते बॉम्बे रक्तगट असल्याचे आढळले. रंगपंचमीच्या दिवशी महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. गर्भाशयातील गाठींसह गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. देशात केवळ 180 लोकांमध्ये आढळणारा हा दुर्मिळ रक्तगट असूनही वेळेत रक्त उपलब्ध झाल्याने महिलेचे प्राण वाचले.