एकनाथ शिंदे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते:संजय राऊतांचा आरोप; भागवत कुंभमेळ्याला का गेले नाही? हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन पलटवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील कुंभमेळ्याला गेले नाहीत. त्यामुळे कुंभमेळ्यात का गेले नाहीत? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मोहन भागवत यांना विचारावा, असे आव्हान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. शिंदे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते, असा दावा देखील त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे देखील हिंदुह्दसम्राट होते. मात्र त्यांचे देखील कुंभमेळा तील एकही छायाचित्र आम्ही पाहिले नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे काय बोलावे याचे ट्रेनिंगच अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना द्यायला हवे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे कुंभमेळासाठी प्रयागराजाल का गेले नाही? असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला होता. त्यावरुन संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हाच प्रश्न सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारावा, असे आव्हान त्यांनी दिले. हिंदुत्व मुद्द्यावर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत असतील तर हाच प्रश्न त्यांनी मोहन भागवत यांना देखील विचारायला हवा, असे देखील ते म्हणाले. डॉ. हेडगेवार यांच्यापासून अनेक सरसंघचालकांची नावे घेत, यांचा कोणाचाही फोटो आम्ही कुंभमेळा येथे गेलेला बघितलेला नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या आधी अनेक कुंभमेळे झाले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते का? ते केवळ पंतप्रधान झाल्यावर कुंभमेळ्याला गेले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यांचे हे सर्व ढोंग असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. आता हे नकली हिंदुत्ववादी आम्हाला प्रश्न विचारत आहेत. आम्ही खरे हिंदुत्ववादी असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. मोदी केवळ पंतप्रधान झाल्यानंतरच कुंभला गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना प्रशिक्षण द्यायला हवे भाजपा काय आहे? आरएसएस काय आहे? कोणते प्रश्न विचारल्यावर बुमरँग होते? हिंदुत्त्वाच्या मुद्यावर कोणते प्रश्न विचारायला हवेत? ज्यामुळे चर्चा होते? अशाबद्दल अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना प्रशिक्षण द्यायला हवे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना प्रशिक्षण देऊन प्रश्न विचारायला शिकवायला हवे, असा टोला देखील त्यांनी लगावला. आमच्या शाळेत शिकून शिंदे तिकडे गेले. आता त्यांचे शिक्षण संपले आहे. असा टोला त्यांनी लगावला. अस्वस्थ आत्म्याने अमित शहांकडे कोंडी झाली अशी तक्रार केली पहाटे चार वाजता एका अस्वस्थ आत्मा त्यांच्या पक्ष प्रमुखांना भेटली, अश शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचे वर्णन केले आहे. त्यांच्यामध्ये झालेला संवाद आज सामना मधून मांडण्यात आला आहे. एक अस्वस्थ आत्मा भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये काय संवाद साधला असेल? असा प्रश्नही त्यांनी विचारला. माझी कोंडी झाली आहे, अशी तक्रार अस्वस्थ आत्म्याने अमित शहांकडे केली असल्याचा दावा त्यांनी केला. या विषयी देवेंद्र फडणवीस यांना सर्व माहिती असल्याचेही ते म्हणाले. तशी चर्चा झाली नसेल तर शिंदेंनी तसे जाहीर करावे. त्यासाठी त्यांनी सावरकरांची शपथ घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.