आमदार संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाची नोटीस:आचारसंहितेत वादग्रस्त विधान भोवणार, 24 तासांत मागितला खुलासा

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा पहिला फटका शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना बसला आहे. आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आयोगाने बांगर यांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्याने संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शुक्रवारी कळमनुरी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे ‘फोनपे’ने पाठवा असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी आमदार बांगर यांनी मतदारांना पैशांचे प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर निवडणूक आयोगाने आमदार संतोष बांगर यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. तसेच पुढील 24 तासांत खुलासा सादर करण्याची मागणी नोटीसीमधून निवडणूक आयोगाने केली आहे. काय म्हणाले संतोष बांगर?
या प्रकरणावर बोलताना संतोष बांगर म्हणाले, मी कोणतेही वक्तव्य केले नाही. विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झाले आहे ते सर्व चुकीचे आहे. विरोधकांकडे काही काम राहिले नाही. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यावर सुद्धा हाच खुलासा करणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले आहेत. तसेच मला ‘फोन पे’चा अर्थ मला माहीत नाही. ‘गुगल पे’ सुद्धा मला माहीत नसल्याचे संतोष बांगर म्हणाले आहेत. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भाजप मतांची फेरफार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती तसेच भाजप पक्षावर जोरदार हल्ला करत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील 150 मतदारसंघात घोळ सुरू आहे. हरण्याच्या भीतीने भाजप मतांची फेरफार करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे सीईओ चोकलिंगम यांना याबाबत पत्राद्वारे तक्रार देखील दिली असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

Share

-