फडवर तेव्हाच गुन्हा दाखल करायला पाहिजे होता:या लोकांनी असे प्रकार कुणाच्या जीवावर केले? सुरेश धस यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कैलास फड याच्यावर आज परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कैलास फड याच्यावर त्याचवेळी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पण बीड पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग आली, असे ते म्हणालेत. हवेत बंदूक फिरवणारे, चुटक्या वाजवणारे असे हे सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजेत, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याच्यासह त्याच्या मुलगा आणि इतर पाच जणांवर आज परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्याच्या 82 दिवसांनंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे सुरेश धस यांनी जोरदार हल्ला चढवला. कैलास फडवर तेव्हाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, असे ते म्हणाले. आमची 5 ते 10 हजार मते कमी झाली माधव जाधव यांच्या बाबतीत कशाप्रकारचे वर्तन केले जाते. त्यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांना चुटकी वाजवून अडवले जाते. या लोकांनी असे प्रकार कुणाच्या जीवावर केले? असा सवाल सुरेश धस यांनी केला. माधव जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातील इतर पाचही मतदारसंघात बसला आहे. आमची 5 ते 10 हजार मते कमी झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला. सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजे माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ त्याच दिवशी व्हायरल झाला होता. तत्कालीन एसपी, जिल्हाधिकारी यांनी तत्काळ आरोपींवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी 82 दिवस उजाडले. हवेत बंदूक फिरवणारे, चुटक्या वाजवणारे हे सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजेत, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसे पार पडले असेल, ते तुम्ही उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकारांवरून ओळखून घ्या. 330 पैकी 200 बूथ ताब्यात घेतले होते, हे यावरून सिद्ध होते, असे सुरेश धस म्हणाले. डीवायएसपींकडे तपास गेल्यापासून परळीतून 12 ते 15 लोक गायब
महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या असतील, तर ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्या माऊलीवर उपोषणावर बसण्याची पाळी यायला नाही पाहिजे. महादेव मुंडेंच्या हत्या होऊन 15 महिने झाले आहेत. महादेव मुंडेंचे मारेकरी सापडेलच पाहिजेत. डीवायएसपींकडे ज्या दिवशी तपास दिला, त्या दिवसापासून परळीतील 12 ते 15 लोक गायब आहेत. या गायब झालेल्या लोकांना पोलिसांनी उचलून आणून जेलमध्ये टाकावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. आकाच्या मुलाचे बॉडीगार्डच आरोपी महादेव मुंडे हत्या प्रकरणात 100 टक्के आकाचा संबंध आहे. ज्यांनी महादेव मुंडेंची हत्या केली, ते गुंड आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरत होते. आता अचानक ते बॉडीगार्ड कुठे गेले? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. सध्या ते बॉडीगार्ड आकाच्या मुलाच्या अवतीभोवती नाहीत. ते बॉडीगार्डच आरोपी असून त्यांना पकडले पाहिजे, असेही धस म्हणाले. या 10-15 जणांच्या नावाची यादी मी एसपींना दिलेली आहे. कुणाकुणाचे सीडीआर चेक केले पाहिजे, यासंदर्भातील डिटेल पत्र एसपींना दिले आहे.

Share

-