पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण:बाहेरचा उमेदवार लादल्याने कोथरुडमध्ये बालवडकर दंड थोपटणार? नाराजांचा जत्थाही सागर बंगल्यावर

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. बाहेरचा उमेदवार नको अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी वेळोवेळी मांडली होती. मात्र, तरीही पक्षाने चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून तिकीट दिले. त्यामुळे भापजचे स्थानिक नेते अमोल बालवडकर बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांना पोटनिवडणुकीपासून उमेदवारी देण्यात येत आहे. त्यामुळे कोथरुडकरांवार बाहेरचा उमेदवार लादला जात असून आम्हाला संधी मिळत नाही, अशी नाराजी स्थानिक नेत्यांमध्ये आहे. यंदाच्या विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी अमाल बालवडकर यांनी पक्षाकडे केली होती. आपल्याला उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा बालवडकर यांनी दिला होता. बावनकुळेंनी काढली समजूत बंडाखोरी इशार दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सकाळीच बालवडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, बावनकुळेंच्या भेटीनंतरही यादीची वाट पाहू, असे म्हणत बालवडकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता अमोल बालवडकर यांचा कोथरुडमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या पत्नी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. यामुळे अमोल बालवडकर यांनी बंडखोरी केली तर कोथरुडची जनता कोणाला साथ देते, हे पहावे लागणार आहे. अमोल बालवडकरांमुळे चंदक्रांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुवर्णा पाचपुतेही बंडखोरीच्या तयारीत?
श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी दिल्याने इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते या नाराज झाल्याचे दिसत आहे. त्यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे, अशी टीका पाचपुते यांनी भाजपवर केली. तसेच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सुवर्णा पाचपुते यांनी म्हटले. राहुरीतील कदम पिता-पुत्र नाराज
भाजपकडून राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम हे देखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळेला तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत. मी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. मी कार्यकर्त्यांमुळे नेता झालो, त्यामुळे त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार आहे. येत्या दोन दिवसात मी याबद्दलचा निर्णय घेईन, असे सत्यजित कदम यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सागर बंगला बनला निवडणुकीचे केंद्र दरम्यान, पहिल्या यादीत नाव नसलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर धाव घेतली. तिकीटासाठी इच्छूक, नाराज आणि तिकीट मिळालेले सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचत आहेत. त्यामुळे भाजपची पहिली यादी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. यामुळे भाजप मुख्यालय नव्हे तर ‘सागर’ बंगला विधानसभा निवडणुकीचे केंद्र बनल्याचे दिसत आहे.

Share

-