साताऱ्यातील कोळेवाडीत ईव्हीएम विरोधात झाला देशातील पहिला ठराव:बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याची मागणी

कराड दक्षिण मतदार संघातील कोळेवाडी ग्रामपंचायतीनं सोमवारी ग्रामसभेत ईव्हीएम विरोधात ठराव घेऊन बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम विरोधात घेण्यात आलेला हा देशातील पहिला ठराव आहे. त्यामुळं ईव्हीएम विरोधात वातावरण वाढत चाललं आहे. कराड दक्षिणमध्ये ७० वर्षांनी काँग्रेस उमेदवाराचा पहिल्यांदाच पराभव झाला असून यंदा भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. कोळेवाडी ग्रामपंचायतीनं ईव्हीएम विरोधात ठराव घेताना यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएममुळे मतदान प्रक्रियेवर संशयाचं वातावरण निर्माण होतंय. त्यामुळे आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही. लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी संशयविरहित मतदान आवश्यक असल्याच्या ग्रामस्थांच्या भावना आहेत. देशात संसदीय लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणूक आणि मतदान ही संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते. त्यावेळी आत्ता सारखं संशयाचं वातावरण कधीच निर्माण झालं नव्हतं. सध्याचं मतदान, निकालावरील मतमतांतरांमुळे ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. हे लोकशाहीसाठी मारक आहे. वेळ खाऊ प्रक्रिया असली तरी पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्यात, असंही ठरावात म्हटलं आहे. आम्हीही ईव्हीएम मशीनवरच मतदान केलं आहे, पण झालेल्या मतदानात काही तरी गडबड असल्याचे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे आमचा ईव्हीएमवरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे, अशी कोळेवाडी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.

Share

-