गौरवसह त्याच्या मित्राने अमली पदार्थाचे सेवन केल्याचा संशय:दोघांना पोलिस कोठडी; पुण्यातील रस्त्यात लघुशंका केल्याचे प्रकरण

पुण्यातील एका चौकात अालिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाने मित्र भाग्येश ओसवालसह अमली पदार्थाचे सेवन करून हा गुन्हा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत असल्याचे पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितले. गुन्हा करण्यापूर्वी गौरव आणि भाग्येश यांनी कुठे अमली पदार्थाचे सेवन अथवा मद्यप्राशन केले, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी गौरव मनोज आहुजा (२५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) आणि भाग्येश प्रकाश ओसवाल (२२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केट यार्ड) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेसह महाराष्ट्र पोलिस अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजता येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात घडली. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यावर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत भाग्येश ओसवालला अटक केली, तर गौरव आहुजा कराड येथे पोलिसांना शरण आला. पोलिसांनी या दोघांना रविवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर केले. आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन करून संगनमताने हा गुन्हा केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून येत आहे. दरम्यान, आरोपीने यापूर्वी अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणात काही जणांची चौकशी करू शकते, अशी माहितीही समोर येत आहे. दरम्यान, या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. गैरकृत्य केल्यानंतर माफीनामा
‘मी गौरव आहुजा, राहणार पुणे. काल माझ्याकडून जे कृत्य झाले होते ते खूप चुकीचे होते. मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलिस आणि शिंदे साहेबांची मनापासून मी माफी मागतो. मला एक संधी द्या.. काही तासांतच मी पोलिसांना शरण जाणार आहे. कृपया माझ्या परिवाराला त्रास देऊ नका,’ असा व्हिडिओ शेअर करत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने संपूर्ण पुणेकरांची माफी मागितली आहे. दरम्यान, गौरव याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेकांनी त्याच्यावर सडकून टीका केली होती.
दाेघांचेही तपासात असहकार्य
दोघांची चौकशी केली असता ते तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. आरोपी गुन्हा करण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी अमली पदार्थ अथवा मद्याचे सेवन केले होते, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील सुनीता डांगे यांनी केला. बचाव पक्षातर्फे अड. पुष्कर दुर्गे आणि अॅड. सुनील रामपुरे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.
गौरव आहुजावर खंडणी, जुगाराचाही गुन्हा आरोपी गौरव आहुजा हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर विमाननगर पोलिस ठाण्यात खंडणी मागणे, जिवे मारण्याची धमकी देणे तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

Share

-