घरी बसून कुंभमेळ्याचे पाणी अस्वच्छ म्हणणे चुकीचे:आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19 वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा, असेही ते म्हणाले होते. यावर भाजप नेते राम कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. घरी बसून पाणी अस्वच्छ आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे राम कदम म्हणाले. यावेळी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचा सल्लाही राज ठाकरे यांना दिला. प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला. कुंभ हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर तो जीवनातील चार महत्त्वाच्या सत्यांचा – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – एक जिवंत संगम आहे. 45 दिवस हा महाकार्यक्रम चालला. या 45 दिवसांच्या कुंभमेळ्यात सुमोर 65 कोटी लोकांना पवित्र स्नान केले. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. त्याला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. घरी बसून पाणी अस्वच्छ म्हणणे चुकीचे मी स्वतः माझ्या कुटुंबासमोर तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक त्या ठिकाणी पवित्र स्नानासाठी गेले, असे राम कदम म्हणाले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक त्या संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून कुंभमेळ्याचे पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार भाजपचे नेते राम कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर केला. संगमाचे पवित्र स्नान पूर्णपणे श्रद्धेचा भाग मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. गंगा नदीत आतापर्यंत लाखो फॅक्टरी आणि गटारांचे आऊटलेट्स होते. आता आपण बऱ्यापैकी ते कमी करत आणले आहे. आपल्याला अजून देखील काही काम करावे लागणार आहे. नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे हा एक भाग आहे. पण, संगमाचे पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापूर्वी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, असा सल्लाही राम कदम यांनी राज ठाकरेंना दिला. नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे? मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, या देशातील एक नदी स्वच्छ नाही. परदेशातील नद्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असे होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे राज ठाकरे म्हणाले होते.

Share

-