वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी:पहिल्यांदाच MSED चा वीज दर कपातीचा प्रस्ताव; इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग दरात मात्र वाढ

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास साधारणपणे 1 ते 15 टक्के वीजदर कपात होणे अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त वीज ग्राहकांना मिळणार आहे. या प्रस्तावानुसार 2025 – 26 ते 2029 – 30 या कालावधीमध्ये 12 ते 23 टक्के दर कपात होईल. राज्यामध्ये 100 पेक्षा कमी युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांना 15 टक्के दर कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही दर कपात 2025 – 26 या कालावधीत लागू होईल. तर त्या पुढील काळात 2027 – 28 मध्ये 100 पेक्षा कमी युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांना 19 टक्के दर कपात लागू होईल. तर 2028 – 29 मध्ये 25% दर कपात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या प्रत्येक वीज ग्राहकाला युनिट मागे 5 रुपये 14 पैसे द्यावे लागतात. या प्रस्तावानुसार 2029 – 30 मध्ये त्याच ग्राहकांना प्रत्येक युनिट मागे 2 रुपये 20 पैसे द्यावे लागतील. त्यामुळे हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांप्रमाणेच औद्योगिक ग्राहकांना देखील या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील वीजबिलात दर महिन्याला तीन टक्के कपात करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार समोर ठेवण्यात आला आहे. तर यामध्ये पाच वर्षांमध्ये 11 टक्क्यांची कपात अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसामान्य ग्राहक आणि औद्योगिक ग्राहक यांना दिलासा मिळणार असला तरी सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी प्रति युनिट 7 रुपये 30 पैसे इतका दर आकरला जातो. यामध्ये 35 टक्क्यांची वाढ अपेक्षित असून दर वाढ झाल्यानंतर एका युनिटचा दर 9 रुपये 96 पैसे इतका असू शकतो. सौरचा वापर 16 हजार मेगावॅटपर्यंत नेणार महावितरण थर्मल पॉवर निर्मित, हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर निर्मित वीज खरेदी करते. याशिवाय पवनचक्की व सौर ऊर्जानिर्मित वीजही खरेदी करते. कोळशाची वीज 4 ते 8 रुपये प्रतियुनिट दराने मिळते. तर सौरऊर्जा 2.50 ते 3 रुपये प्रतियुनिट दराने मिळते. हळूहळू सरकारला सौरऊर्जेचा वापर 16 हजार मेगावॅटपर्यंत न्यायचा आहे. सौरऊर्जेचा वापर वाढेल तसतशे वीज दर कमी होणार आहेत, असे सांगितले जात आहे. शेतकरी वर्गासह सर्व ग्राहकांचा फायदा महावितरणचे स्वतंत्र संचालक व भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षांत 100 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर 5 रु. 87 पैसे प्रति युनिटपर्यंत तर 101 ते 300 युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर 11.82 रु. प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील. एक एप्रिल पासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील. तसा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला आहे. सरासरी वीज पुरवठ्याचा दर सध्याच्या 9 रु. 45 पैसे या दरावरून 2029 -30 पर्यंत 9 रुपये 14 पैसेपर्यंत खाली येणार आहे, असेही ते म्हणाले.

Share

-