अजूनही सरकार स्थापन होत नाही हा तर महाराष्ट्राचा अपमान:आदित्य ठाकरेंची टीका, म्हणाले- काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं कितपत योग्य?

सगळे नियम आणि कायदे हे फक्त विरोधी पक्षांना लागू होतात असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच अजूनही सरकार स्थापन होत नाही हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, निकाल लागून एक आठवडा उलटून गेला तरी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होत नाही आणि सरकार स्थापन होत नाही. हा फक्त महाराष्ट्राचा अपमान नाही तर राज्याला गृहित धरले जात आहे आणि प्रिय निवडणूक आयोगाला मदतही पुरवली जात आहे. संख्याबळ असते तर हा निर्णय एवढा लांबणीवर गेला असता का? आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळे नियम फक्त विरोधी पक्षांना लागू होता. काही विशिष्ट लोकांना नियम कायदे लागू होत नाहीत. परस्पर शपथविधीची तारीख जाहीर करणे, राज्यपालांकडे सरकारस्थापनेचा दावा न करणे ही अराजकता आहे. आणि अशा वेळी काळजीवाहू मुख्यमंत्री सुटीवर गेले आहेत ते ही चंद्राची दशा पाहून, असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची कुठलीही हालचाल दाखवली जात नाहीये. ते लोक दिल्लीवाऱ्यांचा आनंद घेत आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागायला हवी होती ना? जर विरोधकांकडे योग्य संख्याबळ असते तर हा निर्णय एवढा लांबणीवर गेला असता का? असो, जो कोणी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल त्यांना आमच्या शुभेच्छा आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचे धन्यवाद असेही आदित्य ठाकरे म्हणाले. अमावस्या पौर्णिमेला कुठली शेती करतात? आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री होणार कोण हे कुठे ठरलं आहे. दुसरी गंमत अशी की एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी हे ट्विट केले आहे. हा आधिकार राज्यपालांचा आहे. हे कधीपासून राज्यपाल झाले? आपला देश ट्विटरवर कधीपासून चालायला लागला? शपथविधीची तारीख राज्यपाल कार्यालयाने सांगायला पाहिजे होती. सरकार स्थापन करण्याचा दावा अद्याप केलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं कितपत योग्य आहे, राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं. काही दिवसांची सुट्टी घेणं का गरजेचं आहे, कोणीच भेटू शकत नाही तिथे जायचं म्हणजे हेलिकॉप्टर लागतं आणि सर्वसामान्यांकडे हेलिकॉप्टर नाहिये. कुठली शेती आहे जी प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करावी लागते? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Share