अंबरनाथमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा:नराधम शिक्षकाकडून 3 विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलिस कोठडी

गुरू आणि शिष्याच्या नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे. एका खासगी शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शिक्षकाला अटक केली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, शिक्षकावर त्याच्याच संस्थेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. तीन पीडित विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून शाळेत येणे बंद केले असताना ही घटना उघडकीस आली. पालकांनी शाळेत धाव घेत या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात ही घटना घडली आहे. जेम्स असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. आरोपी शिक्षक हा विद्यार्थ्यांकडून मालीश करून घेत होता. याच दरम्यान त्यांचे लैंगिक शोषण देखील करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो हा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, हा नराधम शिक्षक विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करायचा. त्याच्या या किळसवाण्या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते. पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. नराधम शिक्षक जेम्सला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखीन काही विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अल्पवयीन शालेय विद्यार्थी देखील आता सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बदलापूरची घटना अजून कोणी विसरले नसताना अंबरनाथ येथून अशी घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्येच्या मंदिरात देखील विद्यार्थी त्यांच्याच गुरूंपासून सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

Share

-