राज्यस्तरीय मोफत दिव्यांग शिबीर:पुण्याच्या खराडीतील ढोले पाटील महाविद्यालयात आयोजन, सरसंघचालक राहणार हजर

भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोफत बसविण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबीर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी खराडी येथील ढोले पाटील कॉलेज, इऑन आयटीपार्क जवळ हे शिबीर पार पडेल. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्ता चितळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्र‌व्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १३ विकलांग केंद्रांपैकी पुण्यात एक केंद्र कार्यरत असून, कायमस्वरूपी असलेले हे केंद्र गेल्या २५ वर्षापासून अखंड कार्यरत आहे. कोणत्याही सरकारी मदती शिवाय समाजाच्या आधारावर दरवर्षी सुमारे पाच हजार दिव्यांगांना याचा लाभ होत आहे. विश्वस्त व केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी यावेळी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली. गेल्या ५ वर्षापासून परंपरागत जयपूर फूट ऐवजी पन्नास हजार रुपयांचा अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर मोफत बसविण्यात येतात. पुण्यातील या शिबिरात एक हजार दिव्यांगांचे उद्दिष्ट आहे. लाभार्थीना कोणतेही आर्थिक निकष नसून राज्यातील सर्व होतकरू दिव्यांग यात सहभागी होऊ शकतात. मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी स्वतः पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी साठे (9175558356), अनिकेत (9422797106), राजेंद्र (8551064204) यांच्याशी संपर्क साधता येईल. सोमवारी १६ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दिव्यांग शिबिरास भेट आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन होईल. सर्व सेवा भावी नागरिकांनी या जाहीर कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

Share