हिंगोलीत घराचे कुलुप कोयंडा तोडून 3.23 लाखांचा मुद्देमाल पळविला:आदर्श कॉलेज भागातील घटना, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरालगत आदर्श कॉलेज भागात बंद घराचा कुलुप कोयंडा तोडून चोरट्यांनी ३.२३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. ५ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांनी ओळख पटविण्यास सुरवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत आदर्श कॉलेज भागात सनीलकुमार सिन्हा यांचे निवासस्थान आहे. ता. २७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या ते कुटुंबियांसह पुणे येथे मुलाकडे गेले होते. यावेळी घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराचा कुलुप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्व साहित्याची नासधुस केली. त्यानंतर चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाचे कुलुप तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व १.०५ लाख रुपये रोख असा सुमारे ३.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच सिन्हा हे हिंगोली येथे आल्यानंतर घराचे कुलुप तोडण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील साहित्याची नासधुस झाल्याचे दिसून आले. तसेच कपाटही तुटलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार वडकुते, संजय मार्के, धनंजय क्षिरसागर, अशोक धामणे, संभाजी लकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले. मात्र श्‍वान पथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. त्यानंतर आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांची ओळख पटविण्यास सुरवात केली आहे. हा मुद्देमाल गेला चोरीला या घटनेमध्ये चोरट्यांनी साडेचार तोळे वजनाची एक सोन्याची पोत, साडेचार तोळ्याच्या दोन सोन्याच्या पाटल्या, सात ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुल, २३ ग्राम वजनाच्या दोन पाटल्या, एक तोळ्याची सोन्याची अंगठी, १५० ग्राम वजनाचे चांदीचे शिक्के व रोख १.०५ लाख रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे.

Share

-