हिंगोलीत ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम:एकाच दिवसात 800 पेक्षा अधिक नागरीकांच्या स्वाक्षऱ्या

राज्यात ईव्हीएम हटावो देश बचाओ मोहीम काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात आली असून हिंगोलीत रविवारी ता. ८ या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसांत ८०० पेक्षा अधिक नागरीकांनी स्वाक्षऱ्या करून ईव्हीएम हटावोची मागणी केली आहे. पुढील काळात ही मोहिम आणखी तिव्र केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक अनिल नेनवाणी यांनी दिली आहे. याबाबत नेनवाणी यांनी सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा मोठा घोटाळा झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत असतांनाही त्यांना मिळालेले बहूमत संशोधनाचा विषय आहे. सदर प्रकार ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळेच झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ईव्हीएम घोटाळ्याबाबत सर्वस्तरावरून आरोप होत असतांना निवडणुक आयोग तसेच महायुतीचे नेते या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरतंय असे चित्र दिसू लागले आहे. राज्यात आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिम हाती घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हयातही आज हि मोहिम राबविण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयातील महात्मा गांधी चौकात ईव्हीएमच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यानंतर स्वाक्षरी मोहिमेला सुरवात करण्यात आली. दिवसभरात तब्बल ८०० पेक्षा अधिक नागरीकांनी स्वाक्षऱ्या करून ईव्हीएम हटावला पाठिंबा दर्शविला आहे. पुढील काळात हिंगोली जिल्हयात हि मोहिम आणखी तिव्र केली जाणार असल्याचे नेनवाणी यांनी स्पष्ट केले.

Share

-