‘हिना खान ऑपरेशननंतर लगेच कशी हसू शकते?’:अभिनेत्री रोजलिन खानने केला आरोप, म्हणाली- कॅन्सरच्या माध्यमातून सहानुभूती मिळवत आहे

हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. दरम्यान, अभिनेत्री रोजलिन खानने हिनावर सहानुभूती मिळविण्याचा आरोप केला आहे. एका मुलाखतीदरम्यान रोजलिनने सांगितले की, हिनाने 15 तासांची शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला होता, ज्यामुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला. खरंतर रोजलिन खान स्वतः ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत रोजलिनने हिना खानच्या 15 तासांच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले. हे ऐकून आश्चर्यचकित झाल्याचे तिने सांगितले. मॅस्टेक्टॉमीचा संदर्भ देत, तिने सांगितले की तिच्या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस ती स्वत: बेशुद्ध राहिली, त्यामुळे ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर लगेच हिना कशी हसत होती याचे तिला आश्चर्य वाटले. रोजलिनच्या म्हणण्यानुसार, हिना लोकांचे लक्ष वेधण्यासाठी अतिशयोक्ती करत आहे. तिने स्पष्ट केले की मास्टेक्टॉमी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये संपूर्ण स्तन काढून टाकणे आणि पुनर्बांधणी करणे समाविष्ट आहे. ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे, जी 8 ते 10 तास चालते. यामध्ये रुग्ण बेशुद्ध असताना नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. याशिवाय रोजलिनने हिना खानच्या केमोथेरपीदरम्यान परदेश दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केला होता. ते कर्करोगावरील उपचारांच्या नियमांच्या विरोधात असल्याचे तिने सांगितले. हिना विगने आपले टक्कल लपवत असल्याची टीकाही तिने केली. हिना तिच्या कॅन्सरच्या उपचाराबाबत उघडपणे का बोलत नाही, असा सवालही तिने केला. रोजलिन पुढे म्हणाली की जर हिनाला खरोखर स्टेज 3 कॅन्सर असेल तर तिला रेडिएशन करावे लागले असते. लोकांना कळू नये म्हणून हिना तिच्या उपचाराची माहिती लपवत आहे. रोजलिनने हिना खानला आव्हान देत म्हटले की, जर तिला खरोखरच लोकांना कॅन्सरच्या उपचाराबद्दल सांगायचे असेल तर तिने तिचा वैद्यकीय अहवाल सर्वांसमोर ठेवावा.

Share

-