अमेरिकेत अवैध भारतीयांना धास्ती;सुरक्षित राज्यांत गेले 6 लाख लोक:सव्वासात लाख घुसखोर भारतीय, पकडण्याचा धोका…
अमेरिकेत ट्रम्प राजवटीत सुमारे सव्वासात लाख अवैध भारतीय स्थलांतरित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांची धरपकड करून संबंधित देशांत पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी ट्रम्प यांच्या विजयानंतर अवैध स्थलांतरित भारतीयांनी सुरक्षित राज्यांत पलायन सुरू केले होते. स्थलांतरित रहिवासी कार्यकर्ते एनजीओनुसार, २० जानेवारीला ट्रम्प यांच्या शपथविधीपर्यंत ६ लाख घुसखोर भारतीय इलिनॉय, बोस्टन, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसारख्या दोन डझनभर राज्यांत गेले आहेत. अवैध स्थलांतरित या राज्यांना ‘सुरक्षित’ मानतात. कारण हे बायडेन यांचा पक्ष डेमोक्रॅटिक शासित आहेत. या राज्यांत अवैध स्थलांतरितांवर कठोर निर्बंध नाहीत. अनेक अमेरिकी राज्यंात अवैध स्थलांतरितांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळतात. याच्या आधारावर ते सोशल सिक्युरिटी नंबर प्राप्त करू शकतात. अवैध स्थलांतरित रिपब्लिकन राज्यांत जाणे टाळतात. बॉर्डर इमिग्रेशननुसार, कॅनडा सीमेतून २.२५ लाख, मेक्सिको सीमेतून २.२५ लाख व व्हिसा ओव्हरस्टे करून २.२५ लाख भारतीय अमेरिकेत आले. मनुष्यबळात अवैध स्थलांतरित भारतीयांचा वाटा २%, ड्रायव्हरचे वेतन महिना साडेतीन लाख रुपये अमेरिकेत अवैध स्थलांतरित भारतीयांचा मनुष्यबळातील वाटा सुमारे २% आहे. हे बांधकाम कामगार, हॉटेल-रेस्तराँ, किराणा स्टोअर आणि वाहनचालकाचा जॉब करतात. ड्रायव्हरला महिन्याला सुमारे साडेतीन लाख रुपये मिळतात. नोकरी देणाराही अवैध स्थलांतरितास बाजारपेठेपेक्षा कमी वेतन देऊन स्वत: फायद्यात राहतो. नेब्रास्कासारख्या राज्यात अवैध स्थलांतरितांवर टीका झाली आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडातही मोठ्या प्रमाणात अवैध स्थलांतरित अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. कारण : २० फेब्रुवारीनंतर एच-१ बी किंवा वर्क व्हिसा असणाऱ्या दांपत्यांच्या मुलांनाही नागरिकत्व मिळणार नाही. फक्त नागरिकत्वप्राप्त दांपत्य अथवा ग्रीन कार्ड असणाऱ्यांच्या मुलांनाच जन्मानंतर नागरिकत्व मिळेल. मी सध्या शिकागोत माझ्या नातेवाइकांच्या घरी आहे. हाकलून देण्याची भीती वाढली आहे. घरातून बाहेर काढण्याचीही भीती आहे. ४ वर्षांपूर्वी सुखकर आयुष्याच्या शोधात कॅनडामार्गे अमेरिकेत आलो होतो. मात्र, कॅनडातून येथे यायला नको होते,असे आता वाटत आहे. ट्रम्प लोकांना पकडून भारतात पाठवणार असल्याचे रोज ऐकतो. मी शिकागोत काही वकिलांशी संपर्क साधला आहे. मात्र, मनात भीती कायम आहे. -सौरभ (बदललेले नाव) धावपळ : बाळाला अमेरिकी नागरिकत्व मिळण्यासाठी गरोदर महिला प्री-मॅच्युअर सिझेेरियन करून घेताहेत वर्क व्हिसावर आलेल्या महिला व अवैध स्थलांतरित भारतीय गरोदर महिला प्री-मॅच्युअर सिझेरियन करून घेत आहेत. रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट घेतली जात आहे. कारण २० फेब्रुवारीनंतर त्यांच्या नवजात अर्भकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. न्यूजर्सी, जॉर्जिया व मिशिगनच्या रुग्णालयांत अशा गरोदर महिला दिसत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे आई आणि नवजात अर्भकाला धोका होऊ शकतो. मात्र, दांपत्य हा धोका मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांना कोणत्याही स्थितीत नवजात बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व द्यायचे आहे. त्यामुळे असा धोका पत्करला जात आहे. संकट : बक्कळ पैसे देऊन कॅनडातून अमेरिकेत पोहोचले, आता पकडू नये यासाठी लपून बसले मी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला गेलो. तेथे काही दिवसांनंतर एजंटाला सुमारे १५ लाख रु. देऊन अमेरिकेला गेलो. मात्र, अमेरिकेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप खडतर होता. न्यूयॉर्कमध्ये ड्रायव्हिंग लायसन बनवून काम करू लागलो. आता कॅलिफोर्नियात सुतारकाम करत आहे. सध्या अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई होत नाही. मात्र, नव्याने सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा काही भरवसा नाही. -आशुतोष (बदललेले नाव)