एमबीबीएस पेपर फुटी प्रकरणी विज्ञान विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय:चौकशीसाठी समिती गठित, सायबर पोलिसांकडूनही चौकशी सुरू
महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या एमबीबीएसच्या परीक्षांमध्ये पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता महाविद्यालये, विद्यापीठ आणि पोलिसांच्या स्तरावर चौकशी समिति नेमण्यात आली आहे. यानुसार आता पुढील तपास केला जात आहे. पेपर सुरू होण्या आधीच समाज माध्यमांवर पेपर व्हायरल झाल्याची तक्रार करण्यात आली होती. फार्मकॉलॉजी 1 आणि पॅथॉलॉजी 2 या विषयाचा पेपर फुटला आहे. तर आणखी एक पेपर लीक झाल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली आहे. 2 डिसेंबरपासून आतापर्यंत चार पेपर झाले आहेत. फार्मकॉलॉजी 1 या विषयाची पुन्हा 19 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे तर उर्वरित दोन पेपर ऐनवेळी बदलण्यात आले आहेत. तसेच मुंबई येथील दोन आणि अंबाजोगाई येथील एका कॉलेजने पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली आहे. पेपरफुटीची तक्रार मिळताच परीक्षा केंद्रांवर पेपर वाटप करतानाचे सीसीटीव्ही विद्यापीठाने जप्त केले आहेत. तसेच महाविद्यालय स्तरावर चौकशी समिती गठित करून अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचसोबत गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर पोलिसांच्या माध्यमातून ही पेपर फुटीची चौकशी सुरू झाली असून पेपर कोणी लिक केला, कोणा-कोणाला फॉरवर्ड केला याबाबत तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात होणाऱ्या एमबीबीएस परीक्षेचा MCQ स्वरूपातील प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे एक तास आधीच व्हायरल झाली. विद्यापीठाला ईमेलद्वारे या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यातील 50 परीक्षा केंद्रांवर या परीक्षेला सुमारे 7,900 विद्यार्थी हजर होते. मात्र, पेपरफुटीमुळे आता विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा ताण सहन करावा लागणार आहे. पेपर लीक प्रकरणाच्या तपासासाठी विद्यापीठाने सायबर सेलला पाचारण केले आहे. ईमेलच्या स्त्रोताचा मागोवा घेण्यासोबतच संपूर्ण डिजिटल ट्रेलचा तपास केला जात आहे. ही घटना विद्यापीठासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. फेरपरीक्षा आयोजित करावी लागल्याने व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण आला आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही याचा नकारात्मक परिणाम होत आहे.