शेलवडमधील बालाजी संगीत नाट्योत्सवामध्ये ‘देव्हारा’ला प्रतिसाद:आज ‘फटाकडी’चा प्रयोग, सर्व कलावंत स्थानिक, पुरुषांनी केली महिला कलाकारांची भूमिका

तालुक्यातील शतकोत्तर परंपरा असलेल्या शेलवड येथील बालाजी महोत्सवात ग्रामस्थांना तीन संगीत नाटकांची मेजवानी मिळते. १६ ऑक्टोबरला पहिल्या दिवशी ‘देव्हारा’ हे कौटुंबीक नाटक सादर झाले. सर्व स्थानिक कलावंतांनी मांडणी केलेल्या सामाजिक विषयावरील नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री बालाजी प्रासादिक संगीत नाट्य मंडळाचे अध्यक्ष रमणसिंग पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. शेलवड येथे विजया दशमीसाठी श्री बालाजी उत्सवाला सुरूवात होते. त्यात सर्वात आधी मत्स्य अवतार सादर केला जातो. नंतर सलग तीन दिवस संगीत नाटकांचे सादरीकरण केले जाते. या शृंखलेत पहिले नाट्यपुष्प १६ ऑक्टोबरला रात्री ‘देव्हारा’ या नाटकाच्या सादरीकरणातून गुंफले गेले. आईच्या मायेला पारखे झालेल्या दोन भावांमध्ये असणारे अतूट प्रेम त्यात दाखवले आहे. हे होते नाटकातील स्थानिक कलावंत चरणसिंग पाटील, सौरव बोदडे, जयपाल पाटील, अनिल सुशीर, संदीप पाटील, रवींद्र चौधरी, योगेश माळी, सुभाष डापसे, विकी कोकाटे हे नाटकातील कलावंत होते. तर प्रल्हाद प्रशांत चौधरी यांनी दिग्दर्शन केले. संगीत राजू माळी व धोंडू मोढेकर यांनी दिले. तर रंगभूषा बाळू डापसे, राजू महाले यांची होती. केशभूषा रमेश बोरसे, देविदास धोबी, वेशभूषा सुरेश बोरसे, भरत पाटील, ध्वनीव्यवस्था अंबादास मोढेकर, नितेश मोरे, प्रकाश व्यवस्था प्रशांत मोरे, किरण मोरे यांची होती. याशिवाय इतरही नाट्यप्रेमींनी सहकार्य केले.

Share

-