राज्यात 18 डिसेंबरपर्यंत कडाका जाणवणार:धुळ्यात नीचांकी 4, तर संभाजीनगर जिल्ह्यात तापमान 12.2 अंशावर; तीन दिवस थंडीची लाट
उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 ते 14 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात तापमानात कमलीची घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात इतर भागात देखील तापमानात घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हलक्या स्वरुपात पाऊस पडला होता. त्या काळात ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता थंडीचा जो पुन्हा एकदा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील तापमान 8 अंशावर घसरले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. पुढील पाच दिवस देखील नाशिकमध्ये असेच वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागामध्ये तापमान घसरले आहे. मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात तापमान घसरले असून नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात 18 डिसेंबरपर्यंत कडाका जाणवणार उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमवर्षाव होत आहे. तसेच वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट असून त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका आहे. मंगळवारी राज्यात धुळ्यात नीचांकी 4.0 अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगरात 12.2 अंश सेल्सियस तापमान होते. आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात थंडीची लाट तीव्र हाेणार असून राज्यात 18 डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका रहाणार आहे. काही ठिकाणी दवबिंदू गोठण्याची (भू-स्फटिकीकरण) शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
सातपुड्याच्या कुशीत शेत शिवारात बर्फाची चादर सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम भागात वसलेल्या डाब गावात (ता. अक्कलकुवा) मंगळवारी दवबिंदू गोठल्याने शेत शिवारात बर्फाची चादर पसरल्याचे दिसून आले. स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास सपाटीपेक्षा तीन ते चार अंशाने येथे तापमान कमी असते.