इंडिगोच्या पुणे-रायपूर विमानाचे संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग:वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे 161 प्रवासी व 3 बालके सुरक्षित

इंडिगोच्या पुणे- रायपूर (छत्तीसगड) या विमानाने मंगळवारी (११ मार्च) रात्री पुण्याहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यावेळी विमान चिकलठाणा विमानतळाच्या एअर ट्रॅफिक सेंटरच्या कक्षेत होते. चिकलठाणा विमानतळावर विमान तातडीने उतरवण्यात आले. या विमानात १६१ प्रवासी व तीन बालके होते. मात्र, इंडिगोने मुंबईहून आलेल्या विमानातून रायपूरच्या प्रवाशांना पाठवले. त्यामुळे मुंबईला जाणारे प्रवासी खोळंबले होते. रात्री ११.२० वाजता विमान येथे येणार असल्याचे सांगण्यात आले. पुणे विमानतळावरून रात्री आठ वाजता विमानाने उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. संबंधित बाब लक्षात येईपर्यंत विमान छत्रपती संभाजीनगरच्या कक्षेत पोहोचले होते. रात्री साडेआठच्या सुमारास विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी चिकलठाणा विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे परवानगी मागण्यात आली. चिकलठाणा एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परवानगीनंतर विमान येथे उतरविण्यात आले. मुंबई येथून इंडिगोचे विमान सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होते. ते चिकलठाणा विमानतळावर रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी उतरते. परतीच्या प्रवासासाठी मुंबईचे विमान चिकलठाणा विमानतळावरून रात्री ९ वाजून १० मिनिटांनी निघून मुंबई येथे रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचते. पुणे-रायपूर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर इंडिगोचे मुंबई-संभाजीनगर विमान चिकलठाणा विमानतळावर उतरले. तांत्रिक बिघाड असलेले विमान चिकलठाणा विमानतळावर थांबविण्यात आले. मुंबईहून आलेल्या विमानात रायपूरच्या प्रवाशांना रात्री १० वाजून १५ मिनिटांनी रवाना केले. मुंबई जाणाऱ्या प्रवाशांना विलंब छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाण्यासाठी १०६ प्रवासी होते. त्यांना थांबवून घेण्यात आले. त्यांच्यासाठी इंडिगोने मुंबई येथून एक रिकामे विमान संभाजीनगरला पाठवले. रात्री साडेअकरापर्यंत संबंधित विमान चिकलठाणा विमानतळावर आले नव्हते. रात्री १० वाजून १५ मिनिटांना मुंबई येथे पोहोचणारे विमान मंगळवारी साडेबारापर्यंत मुंबईला पोहोचलेले नव्हते. इमर्जन्सी लँडिंगमुळे संभाजीनगरच्या १०६ प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी विमान येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. संबंधित विमान रात्री पावणेबारा वाजता निघून दीडनंतर मुंबई येथे पोहोचेल, असे प्रवाशांना सांगण्यात आले.