इंद्रजीत सावंत धमकीप्रकरण:कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूरला; प्रशांत कोरटकर पसार, मोबाईल स्विच ऑफ

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात नागपूरचे प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला पोहोचले आहेत. मात्र प्रशांत कोरटकर हे दोन दिवसांपासून राहत्या घरातून पसार असल्याची माहिती समोर आलेली आहे. इतकेच नाही तर त्यांचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणी पकडून दिले, असा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणण्याचा दावा केला होता. यावर प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना मध्यरात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप इंद्रजीत सावंत यांनी समाज माध्यमांवर टाकली होती. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. कोल्हापूर मधील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिस नागपूर मध्ये दाखल झाले आहेत. कोरटकरचा शोध घेत असलेले कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपुरातील त्यांच्या घरी पोहोचले आहे. मात्र प्रशांत कोरटकर हे घरात नसल्याची माहिती त्यांच्या घरच्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर पोलिस कोरटकर यांच्या घरातील मंडळींकडून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. नेमके प्रकरण काय? इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास फोनवरून मला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने मला दोनवेळा फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पहिला फोन आल्यानंतर मी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. पण दुसऱ्या फोनमध्ये सदर व्यक्तीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या. जिथे असेल तिथे घरी येऊन बघून घेईन, असे हा व्यक्ती म्हणाला, असे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले आहे. मा. मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे, असेही इंद्रजीत सावंत म्हणालेत. प्रशांत कोरटकरने फेटाळले आरोप प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मी इंद्रजीत सावंत यांना ओळखत नाही. माझ्या नावाने कुणीतरी खोडसाळपणा केला असेल. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी 15 वेळा माझे फेसबुक हॅक करण्यात आले. माझा नंबरही यापूर्वी हॅक झाला होता. सावंत यांनी आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करण्याची गरज होती, असे ते म्हणालेत. ‘छावा’वर काय म्हणाले होते सावंत? विकी कौशल व रश्मिका मंदाना अभिनीत छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर आधारित आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या चित्रपटावर भाष्य करत त्यात इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता. छावा सिनेमात इतिहासाचे वेगळ्या पद्धतीने दर्शन झाले आहे. त्यात सोयरा बाईसाहेबांना खलनायक दाखवण्यात आले. मुळात अण्णाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते. विकीपिडियावर जो खोटा इतिहास लिहिला जात आहे तो काढून टाकण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.

Share

-