काँग्रेसचाही बंडखोरांवर कारवाईचा बडगा:पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन, रमेश चेन्नीथला यांची माहिती

काँग्रेसमधील बंडखोरांवर कारवाई केली असून त्यांचे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन केल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. तसेच राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्याबाबतही माहिती दिली. काँग्रेस महाराष्ट्रात कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नसल्याचेही त्यांची स्पष्ट केले. आमचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना राबवणार असून त्यात महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार आहोत. कर्नाटक आणि तेलंगात ज्या योजनांची घोषणा केली होती. त्या सर्व अंमलात आणल्या आहेत. त्यानुसारच महालक्ष्मी योजनेची देखील महाराष्ट्रात अंमलबजावणी केली जाईल, असे चेन्नीथला यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष 5 दिवस महाराष्ट्रात
प्रियंका गांधी 13 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर असे पाच दिवस महाराष्ट्रात येणार असून राहुल गांधी 12 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर असे चार दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासोबतच कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेचेही महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आयोजन करण्यात आले आहे. तर काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांच्या सभांची जागा वेळ लवकरच सांगणार असल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले. कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही
काँग्रेस महाराष्ट्रात कुठेही मैत्रीपूर्ण लढाई होणार नाही, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेसच्या सर्व बंडखोरांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याचेही त्यांनी सांगितले. हे ही वाचा… काँग्रेसची विदर्भ, तर भाजपची उत्तर महाराष्ट्रावर भिस्त:2019 च्या विधानसभा निवडणूक निकालाद्वारे जाणून घ्या महाराष्ट्राचा यंदाचा मूड महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणांगण आता अंतिम लढाईसाठी सज्ज झाले आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या आपापल्या विजयाचे दावे करत आहेत. पण यावेळी बंडखोर व अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. यात अनेक हेवीवेट नेत्यांचा समावेश आहे. त्यांचे आपापल्या मतदारसंघांत वजनही आहे. सारासार विचार करता यंदाची निवडणूक कदापि एकतर्फी होणार नाही. उलट विजयासाठी प्रत्येकाला कडवी झुंज द्यावी लागेल अशी स्थिती आहे. त्यानंतर विरोधकांचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला विदर्भातून, सत्ताधारी भाजपला उत्तर महाराष्ट्रातून आपल्याला चांगली साथ मिळेल असा विश्वास आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हे याचे प्रमुख कारण आहे… पूर्ण बातमी वाचा…

Share

-