बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाच्या कथित अपमानाची केस:बांगलादेशमध्ये देशद्रोहाचा ठपका ठेवून इस्कॉनसचिव चिन्मय प्रभू यांना अटक, अनुयायी रस्त्यावर
बांगलादेश गुप्तचर विभागाने सोमवारी इस्कॉनच्या चटगाव शाखेचे सचिव चिन्मय प्रभू यांना अटक केली. चिन्मय प्रभू चटगावला जाण्यास निघालेले असताना ढाक्याच्या विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. चिन्मय यांच्यावर ३१ ऑक्टोबर रोजी चटगावच्या पोलिस ठाण्यात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना पोलिस ठाण्याकडे सोपवले जाईल. बीएनपीच सचिव फिरोज खान यांच्याकडून चिन्मय प्रभू यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. ढाक्यात निदर्शने, चटगाव इस्कॉन कार्यालयाच्या बाहेर समर्थकांची गर्दी, निमलष्कर तैनात प्रभू यांच्या अटकेच्या विरोधात ढाक्यात निदर्शने केली गेली. दोन प्रमुख चौकांत रास्ता रोको केला गेला. इस्कॉन मंदिर समितीचे स्वतंत्र दास यांनी ही कृती कट्टरवाद्यांच्या दबावाखाली केल्याचा आरोप केला. सायंकाळी चटगाव येथील इस्कॉन कार्यालयाबाहेर अनुयायी जमा झाले होते. समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या सुटकेची मागणी केली. आता निमलष्करी दलास तैनात केले आहे. बांगलादेशात इस्कॉन ७७ मंदिरांचे संचालन करते. २० हून जास्त जिल्ह्यांत इस्कॉनचे केंद्र चालवले जाते. बांगलादेशात इस्कॉनचे सुमारे ७५ हजारांवर अनुयायी आहेत. चटगावला ही संख्या जास्त आहे.