जयकुमार गोरे बदनामी प्रकरण:’लय भारी’ यूट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार खरातला अटक; सत्तेचा गैरवापर असल्याचा रोहित पवारांचा आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता. या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे स्पष्टीकरण दिले होते. तर या प्रकरणात त्यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल केला आहे. आता या प्रकरणात त्यांची वारंवार बदनामी करण्याचा आरोप असलेला ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार उर्फ तात्यासो आबाजी खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाबाबत मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते की, 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 झाली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यानंतर म्हसवड नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर 2019 पर्यंत चालला आणि त्याचा निकाल लागला. या निकालात कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलेले आहे. जयकुमार गोरे यांनी निकालाची प्रत माध्यमांसमोर दाखवली होती. जप्त केलेला मुद्देमाल मोबाईल नष्ट करण्याचे आदेश कोर्टाने त्याचवेळी दिले होते. आता या प्रकरणात पुन्हा आरोप झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि पत्रकार खरात यांच्यावर हक्कभंग देखील आणला होता. तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली ते माण खटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. सरकारची मनमानी खपवून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू. सर्व मिडियाही त्यांच्या पाठीशी राहील, ही अपेक्षा!’ गोरेंची न्यायालयात लेखी माफी, पण पुन्हा त्रास या घटनाक्रमानंतर जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली. तसेच पुन्हा त्रास देणार नाही, अशी वकिलांमार्फत हमीही दिली. पण आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे ‘बक्षीस’ देण्यात आले आणि त्यांनी महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप होत आहे. जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने म्हटले आहे.

Share

-