जयकुमार गोरेंच्या नोटीसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया:म्हणाले – आम्ही काय चुकीचे केले? त्यांच्या नोटीसीला नक्कीच उत्तर देऊ
जयकुमार गोरेंकडून नोटीस आल्यावर आम्ही त्यावर नक्कीच उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. कुठलीही महिला असेल आणि तिला न्याय मिळत नसेल, तर आम्ही तो विषय मांडू असे म्हटले होते. त्यात आम्ही चुकीचे काय केले? असा सवालही रोहित पवारांनी केला. आपण असे विषय काढत गेल्यावर अनेक विषय निघतील असेही ते म्हणाले. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने विनयभंग केला असे आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत, रोहित पवार आणि एका youtube चॅनेल विरोधात हक्क भंग दाखल करण्यात आला आहे. यावर रोहित पवारांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार म्हणाले की, काल सकाळी माध्यमांशी बोलताना एका महिला पत्रकाराने मुद्दा मांडला होता. त्यांना कोणाचेही नाव न सांगता एका आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. ती तक्रार व्यक्तीगत लेव्हलची आहे, असे त्या महिला पत्रकाराने सांगितले होते. त्यावर बोलताना आम्ही सांगितले की, कुठलीही महिला असेल आणि तिला न्याय मिळत नसेल, तर आमच्याकडे या आम्ही नक्कीच तो विषय मांडू, यामध्ये आम्ही चुकीचे काय केले? असा सवाल रोहित पवार यांनी केला. आता हे प्रकरण एवढे वैयक्तीक घ्यायचे काय कारण होते, हे मला माहीत नाही. पण या नोटीसीला आम्ही नक्कीच उत्तर देऊ, आम्ही खालच्या लेव्हला जात नसतो. जयकुमार त्यांना तो विषय आणखी मोठा करायचा असेल, तर त्याबाबतीत आम्ही बघू. असे रोहित पवार म्हणाले. आम्ही सभापतींवर हक्कभंग आणू शकलो असतो, पण… आपले सभापती म्हणजे माझे विरोधक राम शिंदे हे सभापती झाले. सभापती झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला राजकीय कार्यक्रम घेता येत नाही. पण त्यांनी माझ्याच मतदारसंघात भाजपचा नोंदणीचा कार्यक्रम घेतला. मी त्याबाबत हक्कभंग आणू शकलो असतो. पण पक्षाची जबाबदारी असेल, पक्षांनी त्यांना तिथे पद दिसेल, त्यामुळे आम्ही काही बोललो नाही. त्यामुळे आपण असे विषय काढत गेलो, तर बरेच निघतील. नोटीस आल्यानंतर आता नक्कीच त्याच्या खोलात जाऊ, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. त्या नोटीसीला योग्य ते उत्तर देऊ, असेही रोहित पवार म्हणाले. गोरेंनी थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे यावेळी जयकुमार गोरे यांनी एका युट्युब चॅलनवर देखील हक्कभंग आणला आहे. याबाबत रोहित पवारांना विचारले असता, लोकांचा आवाज लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे मीडिया हे माध्यम आहे. एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि मीडियाने ते दाखवले असेल, तर ते एक माध्यमच झाले. आमच्याविरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात, त्या खऱ्या नसतात. त्यावरून आम्ही कुणावर हक्कभंग आणतो असे नाही. छोटे चॅनेल असू किंवा मोठे चॅनल असू, मीडियाला तो हक्क आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे गोरेंनी त्याठिकाणी थोडा समजुतदारपणा दाखवला पाहिजे. खूप वैयक्तीक घेतले नाही पाहिजे. पण नोटीस काय आहे, हे पाहिल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले. सरकार लाडक्या बहिणींनी विसरत चालले लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो असे सरकार म्हणते. मात्र, सत्तेत आल्यानंतर ते लाडक्या बहिणींनी विसरत चालले आहेत. हे सरकार शेतकऱ्याला देखील विसरले आहे. अनेक नेत्यांनी अनेकवेळा भाषणात आम्ही सातबारा कोरा करू, कर्जमाफी करू, असे म्हटले. परंतु, आता सत्तेत आल्यानंतर आता बरेच नेते असे म्हणतात की, आम्ही कधी बोललो? तसेच लाडक्या बहिणींच्या बाबतीत होत आहे. आम्ही 2100 रुपये करू, नाहीतर आम्ही 2500 रुपयांपर्यंत घेऊन जाऊ असे त्यांनी प्रिंट केले आहे. पण आज मंत्री आणि इतर नेते असे आम्ही बोलले, असे म्हणत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली. सरकारने 50 लाख लाडक्या बहिणींची नावे कमी करण्याचे टार्गेट घेतलेले आहे, असेही ते म्हणाले.