बीम सरकल्याने बुटीबोरी उड्डाणपूलाचा जोड झाला वरखाली:नितीन गडकरींनी दिली होती 200 वर्षांची गॅरंटी
नागपूर-चंद्रपूर आणि नागपूर-वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूलाला जोडणारा बीम सरकल्यामुळे पूलाचा जोड सांधा खालीवर झाली. परिणामी वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूलावरील वाहतूक उड्डाणपूला खालून वळवल्याने वाहतुकीची कोंडी झाली. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्धा रोड आणि बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उड्डाण पूल १७ जून २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुला केला. आता तीन वर्षांत पुलाच्या कामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुटीबोरी येथे अगदी चौकातील पुलाचा काही भाग सुमारे अर्धा फुट खचला आहे. या पुलाचे ‘मटेरियल’ खाली पडत आहे. मंगळवारी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर सुरुवातील एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक पुलावरून बंद करण्यात आली आहे. परिणामी ही वाहतूक बुटीबोरीच्या मुख्य चौकातून वळवण्यात आली आणि वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. सकाळी उड्डाणपुलाजवळील सपोर्टिंग बीम तुटल्याने एकच खळबळ उडाली असून, बीम तुटल्याने उड्डाणपूलाला जोडणारा सांधा सुमारे ८ ते १० इंच खचला. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. कारण या चौकात नेहमीच लोकांची गर्दी असते. घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक पोलिसांनी तातडीने उड्डाण पुलावरील वाहतूक बंद केली. संपूर्ण वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली. सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकडे कायमचे दुर्लक्ष होते. उड्डाण पुलाच्या उद्घाटनानंतर कंत्राटदार टीएनटी कंपनीला उड्डाण पुल आणि त्याला जोडलेल्या १६०० मीटर लांबीच्या सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीचे ५ वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. संबंधित प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. भूमिपूजन समारंभात गडकरी यांनी बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या टीएनटी कंपनीच्या कामाच्या दर्जाचे कौतुक केले होते. आणि उड्डाणपूलाच्या मजबुतीसाठी २०० वर्षांची हमी दिली होती. १ डिसेंबर २०१८ रोजी बांधकाम सुरू झाले आणि १७ जून २०२१ रोजी गडकरींनी स्वत: पुलाचे उद्घाटन केले. उड्डाणपूलावरून जाणाऱ्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक व इतर वाहतूकदारांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र साडेतीन वर्षांतच उड्डाणपूलाच्या दर्जाचा पर्दाफाश झाला.