न्यायाधीशांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला:आरोपीला सोडवण्यासाठी घेतली होती लाच, कोर्टाने चांगलेच फटकारले

सातारा येथील एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी न्यायाधीशानेच लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. एसीबीने या न्यायाधीशांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी आरोपींच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच न्यायालयाने या न्यायाधीश महोदयांना लाच घेतल्याप्रकरणी चांगलेच फटकारले असल्याचे समजते. सातारा सत्र न्यायालयाच्या परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीश महोदय तसेच आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींना ताब्यात घेतले होते. 5 लाखांची लाचप्रकरणी जाळ्यात अडकलेल्या धनंजय निकम यांचा सातारा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. सातारा लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधीश धनंजय निकम यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याबद्दल तक्रारदाराच्या माहितीवरुन लाच लुचपत विभागाने छापा मारत ही कारवाई केली होती. सर्व सामान्य माणूस न्यायालयाकडे न्याय हक्काचे ठिकाण म्हणून बघतो. मात्र, येथील न्यायाधीशच आरोपीला सोडवण्यासाठी लाच घेत असतील तर सर्व सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचे काम आरोपी न्यायाधीश निकम यांनी केले आहे. तसेच घटनेचे गांभीर्य पाहता न्यायालयाने देखील यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Share

-