कैलास नागरेची आत्महत्या महाराष्ट्राला शोभणारी नाही:त्यांच्या मागणीबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू – कृषिमंत्री कोकाटे

राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने आज आत्महत्या केली. शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्यामुळे शासनाच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलत असल्याचे शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. यावर बोलताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही. तो चांगला शेतकरी होता. शेतकऱ्याच्या मागणीबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. कैलास अर्जुन नागरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आज सकाळी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कैलास नागरे हे एक प्रगतीशील शेतकरी होते. त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. कैलासने होळीच्या दिवशीच जीवनयात्रा संपवल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. नेमके काय म्हणाले कृषिमंत्री? मी या शेतकऱ्याबाबत माहिती घेतली. तो एक आदर्श शेतकरी होता. त्याने दोन ते तीन वेळा आंदोलन देखील केले होते, त्याला आश्वासन देखील देण्यात आले होते. त्याचे प्रबोधन करण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी कमी पडला आहे का? हा एक इशू असू शकतो. त्यांना नियमाच्या बाहेर परवानगी हवी होती का? ते पण बघावं लागेल. मात्र जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे कृषिमंत्री कोकाटे यांनी म्हटले. तो चांगला शेतकरी होता, प्रयोगशील शेतकरी होता. त्याला पुरस्कारही मिळाला होता. त्याने आत्महत्या करणे दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राला ही घटना शोभणारी नाही. मला आणि शासनालाही याचे दुःख आहे. त्याला सरकारकडून मदत मिळेल. मात्र, कुटुंबाचा आधार गेला. मी आणि शासन कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. जे कोणी अधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विभागाला कळवले आहे. त्याची मागणी बेकायदेशीर होती का? हे त्याला समजून सांगायला हवं होतं, शासनाच्या नियमात सुधारणा करावी लागेल. पाणी हे आरक्षित असते, अतिरिक्त पाणी हवं असेल तेव्हा शासनाच्या नियमात बदल करावे लागतात, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले. घटनास्थळी आढळली 3 पानी सुसाईड नोट कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक 3 पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. कैलास नागरे गत अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा पुकारला होता. गत डिसेंबर महिन्यात त्यांनी 10 दिवसांचे अन्नत्याग आंदोलनही केले होते. पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर त्यांनी आज टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, मात्र पाणी नाही. केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो. स्वतः शून्य झालो, असे कैलास नागरे यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे.

Share

-