कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करा:फक्त धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्र्यांवर गुन्हे – नाना पटोले
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे की राज्यात पुन्हा अशा घटना होणार नाहीत. पण सरकार यावर ठाम भूमिका घेताना दिसत नाही. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुन्हेगारांचे सरकार आहे, अनेक मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरिक्षण करावे व राज्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा असे नाना पटोले म्हणाले. राज्यात भाजपा युतीचे सरकार तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, सोयाबिन, धान, कांदा, कापूस कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे, दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याची घोषणा भाजपा युती सरकारने केली पण शेतकऱ्यांना वीज बिले पाठवली जात आहेत. वीजेचे दर वाढवले आहेत, एसटीचे तिकिटदर वाढवले आहेत. महाराष्ट्रातून २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, महागाई वाढत आहे पण सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्ष जनतेला भेडसावणारे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारेल, असे नाना पटोले म्हणाले. कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरला आहे, हा लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा व आस्थेचा विषय आहे पण भाजपा सरकारने महाकुंभ मेळ्याचाही इव्हेंट केला आहे. व्हिआयपी कल्चर आणून मोदी-योगी यांचे मोठे बॅनर्स लावले आहेत. या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला पण भाजपा सरकार कोरोना सारखाच आताही मृतांचा आकडा लपवत आहे, माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा मागितला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी-योगी यांचा राजीनामा का मागितला नाही, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला आहे.