कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिकचे शेतकरी आक्रमक:पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

कांदा निर्यात शुल्कात कपात करण्याच्या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क तात्काळ कमी करावे, या मागणीसाठी नाशिकच्या लासलगाव येथे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या पाण्याच्या टाकीवर 10 ते 20 शेतकऱ्यांनी चढून आंदोलन सुरू केले. या विरोधामुळे काही काळ कांद्याचे लिलाव थांबवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सोमवारी कांदा सरासरी २३०० प्रतिक्विंटलदाराने विक्री झाला होता. तोच कांदा या आठवड्यात १६०० रुपयांनी विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे या मागणीसाठी आशिया खंडात नावाजलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडत सुमारे १ तास पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले. दरम्यान आंदोलन सुरू असताना, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोबाईलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत लगेचच अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे आश्वासित केले. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दारात सातत्याने घसरण होत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. गेल्या आठवड्यात कांदा दर २३०० रुपये, शनिवारी १९०० रुपये तर काल सोमवारी १६०० रुपये दर प्रतिक्विंटल कांद्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. गणेश निंबाळकर, निवृत्ती न्याहारकर, केदार नवले केशव जाधव, गोरख संत, सर्जेराव तनपुरे ,दिलीप गायकवाड, मच्छिंद्र गांगुर्डे ,योगेश रोकडे, प्रफुल गायकवाड दीपक पवार ,लक्ष्मण टापसे यांच्यासह ८ ते १० शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सुरू असलेले कांदा लिलाव बंद पाडले. त्यानंतर या संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाइल आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कांदा निर्यात शुल्क पाठविले जात नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही असा पवित्रा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्याने बराच वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र आंदोलन आपल्या मागणीवर ठाम होते शेवटी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. एक तासानंतर आंदोलक खाली उतरले आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव जवळपास दोन ते तीन तास बंद होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांच्याशी संवाद साधणार- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक बाजारभावात घसरन असल्यामुळे नाराज आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क कमी होणे ही राज्य सरकारची देखील भूमिका असून यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी तातडीने संवाद साधून यावर योग्य ते उपाय योजना करण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे.