कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती:देवेंद्र फडणवीसांनी वधू-वराला दिल्या शुभेच्छा, कुटुंबीयांनी उत्साहात केले स्वागत

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निरघुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आज याच पीडित मुलीच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत वधू-वरांना आशीर्वाद दिले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, विवाहाचे निमंत्रण होते, त्यामुळे कोपर्डी गावात आलो. वधू-वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असे फडणवीस यांनी यावेळी म्हंटले. काय होते कोपर्डी प्रकरण?
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर 15 जुलै 2016 रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. याच जितेंद्रने 10 सप्टेंबर 2023 रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात अवघ्या 16 महिन्यांत निकाल लागला. 29 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. तीनही आरोपींना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावली होती.

Share

-