कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी:अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी, छत्रपती संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने चांगलेच यश मिळवले आहे. असे असले तरी काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्के कुटुंबीयांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला असून त्यात संभाजी ब्रिगेडने देखील शिर्के कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे सुरू असतानाच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना डॉ. प्रशांत कोरटकर या व्यक्तीने फोन करून धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले आहेत. अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर छत्रपती संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी. दरम्यान, प्रशांत कोरटकर यांनी फोन करून दिलेल्या धमकीबाबत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये म्हटले की, मा.मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत, यांच्या पोटात श्री. शिव छत्रपतींबद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डिंग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. इंद्रजीत सावंत पुढे म्हणाले, मी मला आलेला फोन त्याची डिटेल्स दिली आहे. हा फोन कोठून आला होता, कोणी केला होता याची तपासणी पोलिसांनी करावी. मला मिळालेल्या धमकीपेक्षा छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दबाबत मी तक्रार दिली आहे. माझ्या धमकीबाबत पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी. कोरटकर यांनी इंस्टाग्राम वरूनही मला धमकी दिली आहे. याच्या पाठीमागे कोण आहे हे तपासण्याची गरज आहे. पोलिसांनी छत्रपतींबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. पुन्हा कोणी धाडस करणार नाही अशी कारवाई करावी, अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली आहे. इंद्रजीत सावंत यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रशांत कोरटकर म्हणाले, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे, त्या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाजही माझा नाही. इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझे नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती. त्यांनी असे काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे, सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहे. प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल दरम्यान, प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ करणारी वक्तव्यं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.