लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?:CM फडणवीस म्हणाले – जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यांपासून मिळतील

यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्माननिधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. पण निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै, डिसेंबर महिना आहे, असेही फडणवीस म्हणाले. विधानसभा निवडणुकीवेळी लाडक्या बहिणींचा सन्माननिधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? असे विचारले जात होते. तर याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेऊ असे, सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पात 2100 रुपयांबद्दल घोषणा करण्यात येईल, असे सांगितले होते. पण, तशी घोषणा झाली नाही. 1500 रुपयेच मिळणार, हे अर्थसंकल्पानंतर स्पष्ट झाले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांबाबत प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत. कुठलीही योजना तयार होते तेव्हा एक गृहितक धरले जाते, तीन कोटी, साडेतीन कोटी. त्या योजनेला अंतिम रुप येते तेव्हा जर ते गृहितक 2 कोटी 70 लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना? योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर महिना आहे. आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवली आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? असे विचारले असता, त्यासंदर्भात निश्चितपणे आमचे काम चालले आहे. एक लक्षात घ्या अर्थसंकल्पाचा समतोल राखणेही महत्त्वाचे आहे. घोषणा दिली आहे, तर ती पूर्ण करायची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या ट्रेंड्स खूप चांगले चालले आहेत. योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतुदीही करणे महत्वाचे असते. समतोल राखत पुढे जायचे आहे, त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. एप्रिल महिन्यात 1500 रुपयेच मिळणार. आम्ही 2100 रुपये कधी मिळणार ते घोषित करु. जेव्हा घोषित करु त्याच्या पुढच्या महिन्यांपासून 2100 रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल. असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अर्थसंकल्पात योजनेबाबत काय म्हणाले अजित पवार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे. हे ही वाचा… लाडक्या बहिणींनो 2100 रुपये विसरा:अर्थसंकल्पात सन्माननिधी वाढीबाबत कोणतीही घोषणा नाही, आता वर्षभर 1500 मिळणार लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होते का? याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागून होते. मात्र, सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींची निराशा करण्यात आली. कारण अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्माननिधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांसाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-