महा कुंभमेळ्यातील मृतांची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारावी:नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, डॉ. बाबा आढाव यांची साताऱ्यात मागणी
सध्या संपूर्ण देशामध्ये धर्मांधतेचे वातावरण पसरवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरी मध्ये हजारो भाविक मृत्युमुखी पडले असावेत आणि तितकेच बेपत्ता झाले असावेत. पण शासन खरा आकडा जाहीर करत नाही आणि खरे आकडे समोर येऊ देत नाही. शासनाची व एकूणच प्रशासनाची यासंदर्भात बेपर्वाई दिसून येते. याप्रकरणी जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ बाबा आढाव यांनी सातारा येथे बोलताना केली. कोल्हापूरला जाताना आज (शुक्रवारी) सकाळी डॉ. बाबा आढाव हे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस साथी नितीन पवार व ओंकार मोरे यांच्या सह सातारा येथे थांबले होते. ९४ व्या वर्षीही डॉ. बाबा आढाव यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. सामाजिक परिस्थिती त्यांना अस्वस्थ करणारी आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. साताऱ्यातील फुले- शाहू – आंबेडकरवादी , परिवर्तनवादी कार्यकर्त्यां कडुन डॉ बाबा आढाव यांनी सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीबद्दल माहिती घेतली. त्यावेळी डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले की महा कुंभमेळा आणि तेथील चेंगराचेंगरी मध्ये बेपत्ता झालेले व मृत्युमुखी पडलेले यांची संख्या लक्षात घेता सरकारचा हलगर्जीपणा यात दिसून येतो. त्यामुळे सरकारने जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. सध्याची देशातील सामाजिक परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. या संदर्भात तरुणाईनेच आता उचल खाल्ली पाहिजे. आणि संविधान टिकवले पाहिजे. आता निर्भय बनुन रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असेही डॉ बाबा आढाव म्हणाले. डॉ. बाबा आढाव यांनी सुरुवातीला महात्मा फुले यांचा, “सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर” हा अखंड म्हटला व सर्वांनी त्यांच्या मागे सामूहिकपणे म्हटला. यावेळी जयंत उथळे, मिनाज सय्यद, अरिफभाई बागवान, सुदामराव आवडे, शिरीष जंगम, दिलिप ससाणे, नारायण जावळीकर, प्रा. संजीव बोंडे, डॉ. राजश्री देशपांडे, नीलिमा देशपांडे, सलमा कुलकर्णी – मोरे, डॉ धनंजय देवी, राहुल गंगावणे, महेश गुरव, सलीम आत्तार, ॲड. विकास उथळे, डॉ. गीतांजली पोळ, अभिजित शिंदे वगैरे विविध संघटनांचे तसेच पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.