महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ:राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार थकबाकी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खुशखबरच मानली जात आहे. यानुसार आता महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2024 पासून लोगू करण्यात आला आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे. अर्थात 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या सात महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2025 च्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला अखेर यश आले असल्याचे दिसत आहे. सध्याची महागाई पाहता सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील एकूण 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आली असून फेब्रुवारीच्या वेतनात कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यात येणार आहे. किती थकबाकी मिळणार? एखाद्या कर्मचाऱ्याचा 40 हजार रुपये मूळ पगार असेल तर 3 टक्के वाढीव भत्त्यासह दरमहा 1200 रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. ही वाढ जुलैपासूनच लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. अशाप्रकारे त्यांना थकबाकी म्हणून 3600 रुपयेही मिळतील.

Share

-