महाराष्ट्रातील लाखो नागरिक होणार वीज बिलमुक्त:शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी योजना जाहीर करण्यात आली असून, यातून लाखो वीज ग्राहकांना वीज बिलमुक्ती मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन वीज धोरणांतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना व जे दिवसा वीज वापरतील त्यांना 10 टक्के वीज दरात सवलत दिली जाणार आहे. हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेऊ शकतील आणि यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला हातभार लागेल. जी वीज आपल्याला 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे, म्हणजे यूनिटमागे 5 रुपये आपण वाचवत आहोत. याचा जवळपास 70 टक्के ग्राहकांना थेट फायदा होणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील 70 टक्के ग्राहक हे 0 ते 100 युनिट वीज वापरणारे आहेत. सरकारच्या नव्या योजनेनुसार, या ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत वीज मोफत मिळणार आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, ज्यामुळे दीड कोटी ग्राहकांना विजेबिलाचा भार सहन करावा लागणार नाही. बळीराजा मोफत वीज योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली असून, याचा फायदा तब्बल 45 लाख कृषी पंपधारकांना होणार आहे. या योजनेसाठी सरकारने 14 हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटींची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चात 10 हजार कोटी रुपयांची बचत या माध्यमातून होणार आहे.या योजनेमुळे कार्बन उत्सर्जनात 25 टक्क्यांची कपात होणार आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्रकल्पाअंतर्गत, 2026 पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असून, विजेच्या किमतीत मोठी कपात होईल.

Share

-