महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान करण्याची परंपरा कोश्यारींना पाडली:भाजपचे लोक ती पुढे चालू ठेवत आहेत, आदित्य ठाकरेंचा मोठा आरोप

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल कोणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल, तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात, याकडे आमचे लक्ष आहे, असे ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. आजही महाराष्ट्रात औरंगजेबाच्या बाजुने बोलले जात आहे, राज्य कुणाचे आहे? सत्ताधारी कोण आहेत? कारवाई झाली का? अटक झाली का? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान करण्याची पाडलेली प्रथा आजही भाजप आणि भाजपकडून सुपारी घेणारे लोक पुढे चालू ठेवत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रकार वाढला आहे. राहुल सोलापूर, प्रशांत कोरटकर यांनी आधीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. तर आता अबू आझमी यांनी देखील औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वक्तव्य सपाचे आमदार आझमी यांनी केले. त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करण्याची प्रथा राज्याचे राज्यपाल राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी पाडली होती, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. ही प्रथा भाजप आणि भाजपकडून सुपारी घेणारे पुढे चालू ठेवत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भाजप आपले जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरून बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील? यावर लक्ष असल्याचे ते म्हणाले. महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या शिक्षेसाठी वेगळा कायदा पाहिजे?
जे चुकतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे आम्ही मागील वेळीही सांगितले होते. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात महाराजांचा अपमान केला जातो, यासाठी कायदा पाहिजे? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. अबू आझमी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना बेड्या ठोकल्याच गेल्या पाहिजेत, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सपाचे आमदार अबू आझमी काय म्हणाले?
औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही, असे वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केले. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत आहे. पण देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे मुस्लिमांवर होणारा अन्याय पाहू शकत नाहीत का? जर समाजातील 20 टक्के लोकांसोबत हे घडत असेल तर ते अजिबात बरोबर नाही. जर तुम्ही त्यांना आरक्षण दिले नाही, त्यांना रोजगार दिला नाही तर ते कुठे जातील? ते हिंदू सणांमध्ये वस्तू विकतात म्हणून तुम्ही म्हणता की ते दारू विकतात. हे चुकीचे आहे. द्वेषाची ही परंपरा थांबवा, अशी मागणीही आझमी यांनी केली.