महाराष्ट्रात राजकीय हत्या सत्र सुरू:दलितांवर अत्याचार करण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

कॉंग्रेस नेते तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर भाष्य केले आहे. तसेच राज्यात राजकीय हत्या सत्र सुरू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांना माहीत असून देखील पोलिस त्या ठिकाणी गेले नाहीत. संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतरच, त्यांची निर्घूण हत्या झाल्यानंतरच पोलिस अॅक्शनमध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रात या ईव्हीएममधून निवडून आलेले सरकार करत आहे का? ही घटना देखील येथे निदर्शनास येत असल्याची शंका नाना पटोले यांनी उपस्थित केली आहे. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, रवींद्र चव्हाण नावाचे माजी मंत्री आणि आता आमदार, त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या एका मुलाला किडनॅप करून ठेवले आहे. 9 कोटी रुपये गायब झालेत. याच्याकडून कुठून आले 9 कोटी मला माहीत नाही. जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवले आहे. 9 कोटी गायब झाले याच्याकडून साडे चार कोटी वसूल केले गेले आहेत. उरलेले साडे चार कोटी मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार सुरू आहेत, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे. नाना पटोले म्हणाले, म्हणून तुम्हाला सांगतो की ईव्हीएम मशीनमध्ये गडबडीने हे लोक निवडून आलेले आहेत. म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या आल्या महाराष्ट्रात दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे, असे नाना पटोले म्हंटले आहेत. दरम्यान, बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली.

Share

-