महाविकास आघाडीला गळती लागल्याचे दिसेल:अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा ‘ऑपरेशन टायगर’ला दुजोरा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. त्यात ‘ऑपरेशन टायगर’ची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील अनेक नेते, आमदार, खासदार हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. मात्र, कुठल्याच आमदार किंवा खासदाराने यावर थेट भाष्य केले नाही. आता भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या काही दिवसातच महाविकास आघाडीला गळती लागल्याचे दिसेल, असे म्हंटले आहे. ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे, कॉंग्रेस पक्ष असो किंवा शरद पवार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते सर्व महायुतीत यायला इच्छुक आहेत. दररोज संपर्क सुरू आहे. नगरसेवकांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. येत्या काही दिवसातच याची सर्वांना प्रचीती आल्याचे दिसेल, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिल आहे. महाराष्ट्रात सध्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहेत. नाशिक येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. यावरून देखील महायुतीमध्ये वाद निर्माण झाला असून आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. गिरीश महाजन म्हणाले, तीनही पक्ष तोलामोलाचे आहेत. म्हणून प्रत्येकाला आपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावे असे वाटत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी कुंभमेळा झाला तेव्हा मी पालकमंत्री होतो. आता पुन्हा दीड दोन वर्षांनी नाशिक कुंभ भरणार आहे, म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पालकमंत्री केले होते. कुंभाचे नियोजन सुरळीत व्हावे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, कुंभमेळ्याचे मोठे चॅलेंज आहे. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्त केले होते. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता. आता नाशिक असो वा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री तीनही पक्षाच्या संम्मतीनेच होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

Share

-