माहेरून पैसे आणण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून छळ:बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, महिलेने नकार दिल्यावर मारहाण करत दिला तलाक

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून माहेरून 15 लाख आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. इतकेच नव्हे तर तिला त्याच्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची देखील सक्ती केली. विवाहित महिलेने यास नकार दिल्यानंतर पतीने मारहाण करत थेट तलाक दिला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. सोहेल हनिफउद्दीन शेख असे या पतीचे नाव असून याने आपल्या पत्नीला जबर मारहाण करत तिला तलाक दिल्यानंतर घराबाहेर देखील काढले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आरोपी सोहेल हनिफउद्दीन शेख हा त्याच्या 28 वर्षीय पत्नीकडे तिच्या माहेरून 15 लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ करत होता. या दोघांमध्ये यामुळे अनेकवेळा वाद व्हायचे. याही पलीकडे जाऊन आरोपीने त्याच्या पत्नीला त्याच्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास देखील जबरदस्ती केली होती. मात्र महिलेने यास नकार दिला. त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपीने तलाक देत तिला घराबाहेर काढून टाकले. दरम्यान, कल्याणमधून दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कल्याणमध्ये नेमके चालले तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कल्याण पश्चिममध्ये अखिलेश शुक्ला याने मराठी कुटुंबावर गुंडांना बोलावून मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना विधानसभेच्या सभागृहात देखील रंगली होती. तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अखिलेश शुक्लाचे प्रकरण ताजे असतानाच कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबावर पांडे नामक परप्रांतीयाने हल्ला केला. यात मराठी कुटुंबातील पती तसेच पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले होते. परप्रांतीय आरोपीने अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी हे मराठी कुटुंब गेले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

-