महायुती सरकारला त्यांच्याच मंत्र्यांनी आरसा दाखवला:रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची ही बातमी महाराष्ट्रातील वास्तव असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच महायुती सरकारला त्यांच्याच मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. आता तरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना जाग येणार का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जत्रेत रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांकडून छेड काढण्यात आली होती. यावेळी टवाळखोरांकडून त्यांचे व्हिडिओ देखील काढण्यात आले. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल घेऊन त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात जाऊन तरुणांना अटक करण्याची मागणी केली आहे. खडसेंच्या मुलीची छेड काढली, हे महाराष्ट्रातील वास्तव
पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची ही बातमी महाराष्ट्रातील वास्तव आहे. पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल‘ करत असतील आणि किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. सरकारला त्यांच्याच मंत्र्यांनी आरसा दाखवला
आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले. आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही कारण गुंडाना महायुतीचे राजकीय संरक्षण मिळते, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. लाडक्या बहीण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली, त्यांच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांना पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी तात्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.