माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका:जयंत पाटील यांच्या विधानाने खळबळ, सर्वांच्याच भुवया उंचावल्या; नेमका रोख काय?

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट दिली. यावेळी जयंत पाटील यांनी मोर्चेकरांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी खळबळजनक विधान केले. माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटलांच्या या विधानाचा रोख काय? असा प्रश्न पडला आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. त्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला काँग्रेस विधिमंडळ विधान सभा नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, विश्वजीत कदम, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी भाषणात बोलताना जयंत पाटील यांनी उपरोक्त विधान केले. मात्र, त्यांच्या विधानाचा अर्थ काय? त्यांचा रोख कोणाकडे होता? यासंदर्भात ते भाषणात स्पष्टपणे काहीच बोलले नाही. काय म्हणाले जयंत पाटील? कोणाची मागणी नसताना नवीन मार्ग तयार केले जात आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण सरकार नवे, नवे रस्ते करण्यात का इंटरेस्ट घेत हे कळत नाही. मोठ मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातून निधी उपलब्ध करायचा, असा प्रकार सुरु आहे. पण ज्याची जमीन जात असेल त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. सरकार जमिनीचे पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर पाहते. परंतु आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नको, असे शेतकरी सांगत आहे. आम्ही भाषण करुन दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आलात तर निर्धार टिकला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी आंदोलकांना उद्देशून म्हटले. माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा, संघर्ष करायला ठाम रहा, मोजणीला अटकाव ठेवा. आमचा दारुण पराभव झाला. आम्ही बोलायचे हळूहळू कमी झालोय, कारण बोलून लोकांना काही समजत नाही. दुसरेच हिंदुत्व वैगरे समोर असते, पण तुमच्या अंगावरून शक्तिपीठ जाईल, असे जयंत पाटील म्हणालेत. राजू शे्ट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत असेही जयंत पाटील यांनी म्हटले. यावेळी, शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर, माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काही खरे नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यावर, अनेकांनी भुवया उंचावल्या तसेच त्यांच्या बोलण्याचा रोख काय होता? असा प्रश्न पडला आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत सराकरची भूमिका काय? राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो लादायचा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केली. प्रस्तावित महामार्गामु्ळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना हा महामार्ग हवा आहे. समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यांतील जीवनमान बदलले. त्यानुसार या महामार्गामुळेही अनेकांचे जीवन बदलणार आहे. आज जसा या प्रकल्पाविरोधात मोर्चा आला, त्याहून तिप्पट गर्दी हा महामार्ग व्हावा यासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला होईल. ज्या गावांमध्ये सभा झाल्या. त्या गावांतील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. या प्रकरणी जमिनीच्या पाचपट भाव दिला असून, यासंबंधी विरोधकांनीही मदत करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Share

-