माझी मुलगी आहे धिंगाणा घालून ठेवेल:दोन-तीन थोबाडीत लगावेल, रक्षा खडसेंचा आरोपीवर हल्लाबोल; कॉल रेकॉर्ड व्हायरल

केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच सध्या रक्षा खडसे यांनी पीयूष मोरे या आरोपीला चांगलेच खडसावले असल्याचे समोर आले आहे. त्यांचा कथित कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डमध्ये मंत्री रक्षा खडसे यांनी पीयूष मोरे या आरोपीला चांगलेच धारेवर धरल्याचे ऐकू येत आहेत. तुला लाज वाटली पाहिजे आपल्या बहिणीसारखी आहे ती आणि हे असे प्रकार करता. थोबाडीत लावायला पाहिजे दोन-तीन. तसेच धिंगाणा घालून ठेवेल ती माझी मुलगी आहे, असा इशारा देखील रक्षा खडसे आरोपीला देताना ऐकू येत आहे. (दिव्य मराठी या कॉल रेकॉर्डची पुष्टी करत नाही) दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेली होती. यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली. हा प्रकार समजल्यानंतर रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही रक्षा खडसे यांनी पोलिसांना केला. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. हा खूप गंभीर प्रकार सत्ता कुणाचीही असो, प्रशासनाकडे जेव्हा अशा तक्रारी येतात. त्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. एक पोलिस कर्मचारी ड्रेसवर मुलींसोबत असताना असा प्रकार घडत असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा बोलले आहे. त्यांनी सुद्धा एसपींना याबाबत सुचना दिलेल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले. हेही वाचा

Share

-