मला न्याय मिळाला नाही तर इथेच आत्महत्या करणार:सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आक्रोश

तुम्ही मला न्याय दिला नाही मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देणार, असा इशार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दिला आहे. परभणीमध्ये झालेल्या संविधान विटंबना घटनेनंतर घडलेल्या हिंसा प्रकरणानंतर पोलिसांनी धरपकड करत अनेकांना अटक केली. यात सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये असतानाच मृत्यू झाला होता. परभणीच्या या घटनेला आता दीड महिना पूर्ण होत आला असला तरी देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सोमनाथ यांची आई गेल्या होत्या. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासमोर त्यांनी आक्रोश व्यक्त केला. तसेच तुम्ही मला न्याय दिला नाही मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. माझा जीव गेला तरी बेहत्तर पण मी न्याय घेणारच, अशी भूमिका सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने घेतली आहे. परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिवार बाजार येथील मैदानापासून हा मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला. यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात संविधानाचे फलक घेवून मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान सरकार जाणून-बुजून या तीनही कुटुंबीयांना न्याय देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र आम्ही न्यायालयीन लढा लढू पण आम्ही या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देऊ, अशी भूमिका वंचितच्या नेत्यांनी घेतली आहे.

Share

-